Sam Altman : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढते सामर्थ्य पाहता, त्याचे लोकशाहीकरण करणे हाच मानवतेसाठी एकमेव न्याय्य आणि सुरक्षित मार्ग असल्याचे प्रतिपादन ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी गुरुवारी केले. दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना त्यांनी एआय क्षेत्रातील प्रगती आणि भविष्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला. ऑल्टमन (Sam Altman) यांच्या मते, खऱ्या अर्थाने सुपर इंटेलिजन्सची प्राथमिक आवृत्ती अवघ्या दोन वर्षांत जगासमोर येऊ शकते, ज्यामुळे मानवी इतिहासाला नवी दिशा मिळेल. ऑल्टमन यांनी एआयच्या भविष्याबाबत तीन महत्त्वाची सूत्रे मांडली. ते म्हणाले की, तंत्रज्ञानावर काही मोजक्या संस्थांची मक्तेदारी असण्याऐवजी ते सर्वांसाठी खुले असणे आवश्यक आहे. एआयचे लोकशाहीकरण हे केवळ मानवतेच्या भरभराटीसाठीच नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनिवार्य आहे. काही घटक कॅन्सरसारख्या आजारांवरील उपचारांच्या बदल्यात हुकूमशाही प्रवृत्ती स्वीकारण्यास तयार असतील, मात्र अशा प्रकारची तडजोड करणे धोक्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रगती आणि लोकशाही मूल्ये यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताने एआय क्षेत्रात मारलेल्या भरारीचे ऑल्टमन यांनी विशेष कौतुक केले. एका वर्षापूर्वीच्या भारत भेटीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात भारताने एआयचा वापर आणि प्रगती यामध्ये केलेली कामगिरी थक्क करणारी आहे. प्रगत एआयच्या वापरामध्ये भारताचे नेतृत्व स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात भारताने दाखवलेली चपळता जगासाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यातील एका मोठ्या बदलाचे संकेत देताना ऑल्टमन यांनी दावा केला की, २०२८ च्या अखेरपर्यंत जगातील बौद्धिक क्षमतेचा मोठा हिस्सा मानवी मेंदूऐवजी डेटा सेंटर्समध्ये एकवटलेला असेल. भौतिक जगाबाहेरच्या या बौद्धिक क्रांतीमुळे जगाची कार्यपद्धती पूर्णपणे बदलणार आहे. मात्र, ही प्रचंड शक्ती सुरक्षित आणि सर्वांच्या हिताची राहावी, यासाठी जागतिक स्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.