पुण्यात लोकमान्य टिळकांना रंगावलीतून वंदन

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने 101 दीप प्रज्वलित करुन त्यांच्या कार्याचे स्मरण देखील उपस्थितांनी केले.
टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी व सार्वजनिक गणेशोत्सवाची बीजे रुजविण्यात टिळकांचे असलेले योगदान दर्शविणारी ही रंगावली 20 बाय 20 फूट आकारामध्ये साकारण्यात आली.
जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी दोन तासांमध्ये ही रंगावली साकारली. सुरेखा जाधवर म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवातून समाजाला एकत्र केले. त्यातून स्वातंत्र्याचा लढा उभारता येतो, अशी प्रेरणा सामान्यांना दिली. त्यामुळे रंगावलीमध्ये गणेशोत्सव साकारत आणि दीप प्रज्वलित करुन त्यांना मानवंदना देण्यात आली. पुढील दोन दिवस ही रंगावली संस्थेच्या प्रांगणात पाहण्यासाठी सर्वांना खुली राहील.





