डीएचएफल घोटाळ्यातील वाधवाच्या बंगल्यात सलमानचा मुक्काम

वाई – बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुरुवारी (दि. 20) सायंकाळी महाबळेश्वरमध्ये पोहोचला आहे. पावसाळी हवामान आणि दाट धुक्यामुळे महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य खुलले आहे. त्याचा आनंदही सलमान घेत आहे. मात्र, डीएचएफएल घोटाळाप्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या वाधवान याच्या बंगल्यात सलमानने वास्तव्य केल्याने सार्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. वास्तव्यासाठी सलमानने हाच बंगला का निवडला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बिष्णोई टोळीच्या सदस्यांनी सलमानच्या घरावर केलेला गोळीबार, त्याला ठार मारण्याची दिलेली धमकी याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
गोळीबारानंतर सलमान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती. त्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात आणि चित्रपटसृष्टीत झाली होती. या परिस्थितीत सलमान आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाबळेश्वर येथे दाखल झाला. त्यानंतर त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु दाट धुक्यामुळे तो दरे येथे जाऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांच्या गावी जाण्याचा त्याचा नेमका काय उद्देश होता, हे समजलेले नाही. घरावर झालेल्या गोळीबारानंतर सलमानला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलीस संरक्षणात व महागड्या दहा-बारा गाड्यांच्या ताफ्यात सलमान महाबळेश्वर येथे आला आहे.
विशेष म्हणजे सलमान खानने महाबळेश्वरमध्ये वाधवानच्या बंगल्यात वास्तव्य केले आहे. डीएचएफएल घोटाळ्यात वाधवान बंधू आरोपी आहेत. करोना काळात वाधवान यांनी महाबळेश्वरमध्ये केलेल्या मुक्कामाचीही चर्चा झाली होती. वाधवान बंधूंची महाबळेश्वर येथे मोठी जागा आणि दोन-तीन बंगले आहेत. त्यातील एक बंगला आणि इतर बंगल्यांमधील महागडी पेंटिंग्ज व फर्निचर ईडीने जप्त केले आहे. सलमानच्या चित्रपटाचे चित्रीकरण कोठे होणार आहे, त्याचा मुक्काम किती दिवस आहे, हे समजलेले नाही. त्याचा मुक्काम असलेल्या बंगल्याचे गेट बंद असून, तेथे पोलीस संरक्षण आहे. बंगल्याच्या आवारात गाड्यांचा ताफा उभा आहे. त्यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे.

