Salman Khan : सलमान खानची पहिली कमाई फक्त ३५ रुपये! सांगितली कधीही न ऐकलेली गोष्ट; म्हणाला “लोकांनी तुमचा अपमान करण्याचा…”
Salman Khan : या मुलाखतीत सलमानने आपल्या आयुष्यातील पहिल्या कमाईचा भन्नाट किस्सा सांगितला.

Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात त्याने ‘रामायण’ चित्रपटाबाबत आपले स्पष्ट मत मांडले होते. तसेच चित्रपटातील व्हीएफएक्सविषयीही त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले होते. आता एका मुलाखतीत सलमानने आपल्या स्टारडमपासून ते करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत.
पहिली कमाई अवघी ३५ रुपये!
या मुलाखतीत सलमानने आपल्या आयुष्यातील पहिल्या कमाईचा भन्नाट किस्सा सांगितला. ताजमहाल येथे आयोजित एका कार्यक्रमात नृत्य सादर करण्यासाठी त्याला अवघे ३५ रुपये मिळाले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी तो फारसा चांगला नर्तक नसल्याने त्याला कलाकारांच्या मागच्या रांगेत उभे करण्यात आले होते. मात्र, याच कार्यक्रमातून त्याच्या हातात पहिल्यांदा कमाईचे पैसे आले होते.
सलमानने सांगितला यशाचा कानमंत्र
या छोट्याशा अनुभवातून सलमानने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा संदेशही दिला. तो म्हणाला, “आयुष्यात एक पाऊल पुढे टाका आणि मग दुसरे. लोकांनी तुमचा अपमान करण्याचा किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तरी थांबू नका.” हळूहळू चालत असाल, धावत असाल, पडलात किंवा पुन्हा उठलात तरी आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवा.
२१ लाखांचं चित्र आवडलं नाही; स्वतःच बनला चित्रकार!
सलमान खानला चित्रकलेचीही विशेष आवड आहे. मात्र, त्याच्या या छंदामागे एक रंजक किस्सा आहे. सलमानने आपल्या पाळीव कुत्र्याचे, मायकलचे चित्र काढण्यासाठी एका कलाकाराला बोलावले होते. कलाकाराने चित्र तयार केले, मात्र ते सलमानच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. या चित्रासाठी तब्बल २१ लाख रुपये मोजावे लागणार होते. त्यामुळे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा काहीशे रुपयांचा कॅनव्हास आणून आपणच चित्र काढावे, असा विचार त्याने केला.
याच प्रसंगातून त्याच्या चित्रकलेच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली. आता शूटिंगमधून वेळ मिळेल तेव्हा तो आवर्जून चित्रे काढतो. क्रिकेट, फुटबॉल, पोहणे आणि सायकलिंग यांसारख्या गोष्टींमध्येही त्याला रस आहे. शिव, बुद्ध आणि मदर तेरेसा यांसारख्या विविध विषयांवर त्याने चित्रे साकारली आहेत. एवढेच नाही, तर त्याने स्वतः काढलेली चित्रे मित्रांनाही भेट दिली आहेत.
एकाच दिवशी होणार रिलीज
दरम्यान, मातृभूमी हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह स्क्रिन शेअर करताना बघायला मिळणार आहे. याच दिवशी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ईठा देखील प्रदर्शित होणार असल्याने मातृभूीमी आणि ईठा या दोन चित्रपटांमध्ये बॅाक्स अॅाफिसवर क्लॅश होणार असून यामध्ये कोणाता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






