Nasarapur : शिंदेवाडीत गांजाची विक्री उघड! राजगड पोलिसांनी सापळा रचून केली धाडसी कारवाई

नसरापूर : भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथे गांजाची बेकायदेशीर विक्री उघडकीस आणत राजगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या व्यक्तीला वैद्यकीय कारणास्तव अटक न करता सध्या मुक्त ठेवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांची ही कारवाई अमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसवणारी ठरली आहे.
दुर्गम भागातील ‘गांजा जाळे’ उघडे पडले
गोपनीय माहितीच्या आधारे राजगड पोलिसांनी ३१ मे रोजी सायंकाळी सव्वासात ते साडेआठच्या सुमारास शिंदेवाडी येथे सापळा रचून ही कारवाई केली. गोरख मारुती साळुंखे (वय ६०) आणि संजय अशोक कल्याणकर (वय २५) या दोघांकडे गांजा बाळगला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाड घालून त्यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ किलो २८४ ग्रॅम वजनाचा वाळलेला गांजा, ज्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत २३,००० रुपये इतकी होते, तो हस्तगत केला. तसेच, गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक दुचाकी (किंमत सुमारे १५,००० रुपये) सुद्धा जप्त करण्यात आली. एकूण ३८, हजार रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
एकाला अटक, दुसरा अजून मोकळा: नागरिकांत चर्चेला ऊत
या प्रकरणात संजय कल्याणकर यास अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर गोरख साळुंखे यास वैद्यकीय कारणामुळे तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मात्र, गांजा दोघांच्या ताब्यात सापडूनही एकाला मोकळे सोडण्यात आले असल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पोलिसांकडून माहिती देण्यास उशीर: माध्यमांचा निषेध
ही घटना घडल्यानंतर बराच वेळ राजगड पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दररोज घडणाऱ्या गुन्ह्यांची तत्काळ माहिती देणारे पोलीस विभाग या प्रकरणात मात्र गप्प राहिल्याचे चित्र दिसले. बातमीदारांनी विशेष चौकशी केल्यानंतरच माहिती समोर आली, हे विशेष नमूद करावे लागेल.
गुन्हा NDPS कायद्यानुसार दाखल: तपास अजून सुरू
या प्रकरणी NDPS Act 1985 (Amendment सहित) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासाचे काम पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात अजून काहीजण सामील असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवण्यात येत आहेत.
स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
डोंगराळ, जंगलवस्तीत गांजाच्या विक्रीसारख्या घटना समोर येत असल्याने वेल्हे-भोर परिसरातील युवकांच्या भवितव्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. “ही सुरुवात आहे की आणखी मोठे रॅकेट?”, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. पोलीस प्रशासनाने गांजा विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.





