दरमहा 10 हजार रुपये पगार…. शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगेंचा लढा; सरकारकडे केल्या ‘या’ 8 मोठ्या मागण्या

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड येथील नारायणगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात आजारी असूनही उपस्थित राहिलेल्या जरांगे यांनी मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर भाष्य केलं. अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे 8 मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास दिवाळीपर्यंत आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे.
जरांगे पाटलांच्या 8 मागण्या:
ओला दुष्काळ जाहीर करा: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करावा.
70 हजार रुपये हेक्टरी भरपाई: शेतीच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 70 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष मदत: नदीच्या काठावरील शेती वाहून गेल्याने प्रभावित शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपये मदत द्यावी.
संपूर्ण कर्जमुक्ती: शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरी: विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.
हमीभावाची हमी: शेतकऱ्यांना पिकांसाठी हमीभाव मिळालाच पाहिजे, अन्यथा आंदोलन सुरू राहील.
शेतीला नोकरीचा दर्जा: शेतीला नोकरीचा दर्जा देऊन 10 एकरच्या आत शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दरमहा 10 हजार रुपये पगार द्यावा. यामुळे तरुण पिढी शेतीकडे वळेल आणि शेती विक्री थांबेल.
पीकविमा सुधारणा: पीकविम्यासाठी सरकारने लादलेले तीन ट्रिगर काढून टाकावेत आणि पीकविम्याची रक्कम तात्काळ द्यावी.
आंदोलनाची तयारी:
जरांगे यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं, “या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण न झाल्यास धाराशिव किंवा बीडच्या सीमेवर शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ. जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा येथे बैठका घेऊन आंदोलनाची तारीख निश्चित करू. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही.”
या मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जरांगे यांच्या मागण्यांनी शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली असून, सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





