संभ्रमावस्था दूर; दोन टप्प्यात दिली जाणार रक्कम
पिंपरी – महापालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या चार दिवसांपासून लांबलेल्या वेतनाबाबत आज (शनिवारी) अंतिम निर्णय घेण्यात आला. शासनाच्या आदेशानुसारच वेतन दिले जाणार असून, वर्ग एक व दोनच्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के, वर्ग तीन 75 टक्के तर चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन दिले जाणार आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
करोनाची पार्श्वभूमी, मार्च महिना आणि सध्या राज्यावर असलेले आर्थिक संकट याचा विचार करून राज्य शासनाने दोन टप्प्यात वेतन देण्याचा निर्णय 30 मार्च रोजी घेतला होता. तर त्याबाबतचा आदेश वित्त विभागाने 31 मार्च रोजी काढला होता. हा आदेश काढताना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना हा निर्णय बंधनकारक असल्याचे म्हटले होते. मात्र राज्यातील कोणत्याही महापालिका आयुक्तांना हा आदेश पाठविण्यात न आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पालिका स्तरावर वेतनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दर महिन्याला एक तारखेला होणारे पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही न झाल्यामुळे या संभ्रमामध्ये भरच पडली होती.
आज महापालिका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांशी चर्चा करून शंभर टक्के वेतन देण्याबाबत मागणी केली. मात्र शासन आदेशनुसारच वेतन केले जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेतील वर्ग एक आणि दोनच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के तर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन दिले जाणार आहे. उर्वरित वेतन पुढील आदेश आल्यानंतर दिले जाणार आहे. वेतन कशा पद्धतीने दिले जावे याबाबत शासनाने स्पष्ट आदेश दिल्यामुळे त्या पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे कामही शनिवारी सुरू करण्यात आल्यामुळे मंगळवारी (दि. 7) रोजी कर्मचाऱ्यांचे वेतन होण्याची शक्यता आहे.
आरोग्य, वैद्यकीयबाबत वेगळा निर्णय
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या आणि आप्तकालीन परिस्थीमध्ये कार्यरत असलेल्या वर्ग एक ते तीनच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन देण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र शासनाला पाठविले आहे. शासनाच्या मंजुरीनंतर उर्वरित वेतन तातडीने देण्यात येणार आहे.
शंभर टक्के वेतन द्या – महासंघ
आरोग्य, वैद्यकीयसह करोनासाठी अनेक विभागातील कर्मचारी महापालिकेत कार्यरत आहेत. तसेच शासनाचा आदेश आयुक्तांना पाठविण्यात आलेला नसून, पालिकेची आर्थिक स्थितीही चांगली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के वेतन देण्यात यावे, अशी भूमिका कर्मचारी महासंघाने घेतली आहे.