कंपनी कर्मचाऱ्यांना वाहन पास द्यावेत
पिंपरी – करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे कार्यालयीन कामकाजदेखील ठप्प झाले आहे. त्यामुळे कामगारांचे पगार करणे कठीण झाले आहे. तेव्हा प्रशासनाने याची दखल घेऊन कार्यालय उघडण्यासाठी परवानगी देऊन त्यांच्यासाठी वाहन पास द्यावेत. तसे कंपन्यांना अर्ज करण्यासाठी त्वरित लिंक तयार करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लॉकडाउनमुळे बाजार पेठ, कंपन्या, कार्यालये बंद आहेत. कार्यालयांमध्ये कर्मचारीच नसल्याने मार्च महिन्याचे वेतन कसे द्यायचे, असा प्रश्न उद्योजकांपुढे निर्माण झाला आहे. किमान कंपन्यांच्या अकाउंट व मनुष्यबळ विभागातील कर्मचारी व मालक वर्गाला कार्यालयात येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी अत्यावश्यक कामाकरिता परवानगीसाठी लिंक चालू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलिसांनी फक्त उद्योजकांसाठी लिंक चालू करावी.
उद्योजक, अकाउंट व मनुष्यबळ विभागातील कर्मचारी यांच्यासाठी किमान तीन दिवसांचा पास वितरित करण्यात यावा. शासनाच्या आदेशाप्रमाणे उद्योजक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास तयार आहेत. तरी उद्योजक, अकाउंट व मनुष्यबळ विभागातील कर्मचारी यांच्यासाठी तीन दिवसांसाठी परवानगी द्यावी.