पुणे | विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुला- मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी सर्व शाळास्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा सुमारे चार हजार ८६१ शाळांमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
शाळांत विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील, तर ही समिती त्याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी निर्भयपणे शाळेत मुक्त वावरू शकतील. जिल्ह्यामध्ये ही समिती स्थापन होऊन प्रत्यक्ष कार्यही सुरू झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्याचा अधिकार आहे. शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार, बालविकासावर परिणाम होईल, अशा प्रभावापासून संरक्षण मिळविण्याचा बालकांना हक्क आहे.
सखी सावित्री समितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. यात महिला शिक्षक – सदस्य, समुपदेशक- सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला)- सदस्य, अंगणवाडी सेविका- सदस्य, पोलीस पाटील-सदस्य, ग्रामपंचायत सदस्य (महिला)- सदस्य, पालक (महिला) -सदस्य, विद्यार्थी (२ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी)- सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक – सदस्य सचिव असणार आहेत.
‘सखी सावित्री’ समिती कार्ये
शाळाबाहेर मुला- मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे. मुला- मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे. शिक्षणाबाबतच्या शासकीय योजनांची माहिती देणे. करिअरसंबंधी मार्गदर्शन करणे. मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
मुला-मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे. बालविवाह रोखून, पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला- मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.
शाळेत समतामूलक वातावरणासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे. विद्यार्थी- विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत, अशी निकोप वातावरण निर्मिती करणे.

