शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश होणार – शिक्षणमंत्री दादा भुसे

आळंदी: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून, वारकरी संप्रदाय युवा मंच यांच्या वतीने आयोजित वारकरी युवा परिषद श्रीक्षेत्र आळंदी येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कीर्तनकारांना मार्गदर्शन आणि विमा कवच –
या परिषदेत राज्यभरातील बहुसंख्य युवा कीर्तनकार सहभागी झाले होते. कीर्तनकारांचे संरक्षण, कल्याण आणि वारकरी परंपरेतील त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यासाठी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, प्रमोद महाराज जगताप, माधवदास महाराज राठी, अमृताश्रम स्वामी महाराज, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, श्रावणमहाराज अहिरे आणि एकनाथमहाराज कोष्टी यांनी उपस्थित युवांना मोलाची दिशा दिली.
यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या:
१. शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित केली जाईल आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
२. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनानिमित्त ‘एकनाथ हिरक वर्ष’ अंतर्गत प्रथम टप्प्यात राज्यातील ६०० वारकरी कीर्तनकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा मोफत विमा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
संत साहित्याचा प्रसार: ६०० कीर्तनकार सक्रिय होणार-
वारकरी संप्रदाय युवा मंचाचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले यांनी सांगितले की, राज्य प्रशासन तसेच शालेय विभागासोबत सहाशे कीर्तनकार सक्रिय काम करतील. हे कीर्तनकार शाळेतील विद्यार्थ्यांना संत साहित्याबाबत माहिती देण्याचे आणि प्रबोधनपर कार्य करण्याचे काम करतील. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आपल्या प्रबोधनातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतील.
परिषदेत वारकरी परंपरेचे संवर्धन, संत वाङ्मयाचा प्रसार, दिंडी परंपरेचे शाश्वतीकरण आणि युवा नेतृत्व विकास या विषयांवर व्यापक चर्चासत्रे घेण्यात आली. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी उपस्थित युवा कीर्तनकारांचे पूजन देखील करण्यात आले.
राज्यभरातून आलेल्या वारकरी युवकांनी या परिषदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संत साहित्याचा अभ्यास, दिंडी परंपरा, सामाजिक कार्यातील वारकरी योगदान आणि तरुण पिढीतील नेतृत्व विकास या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी युवा मंचाचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले यांनी केले. किशोरमहाराज धुमाळ, निळोबा महाराज ढोमसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मंचाचे सचिव ह.भ.प. उमेश महाराज बागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.





