आजपासून हार-फुले साईचरणी विसावली

शिर्डी – श्री साईबाबांच्या समाधीपर्यंत हार-फुले गेली पाहिजेत, अशी देशातील संपूर्ण साईभक्तांच्या मनात आस्था होती. साईभक्तांच्या मनातील श्रद्धा व त्यांच्या प्रार्थनेने हार-फुलं पुन्हा साईसमाधी मंदिरात चालू झाले, याचा मला मनस्वी आनंद आहे. तालुक्यातील सर्वसामान्य फुल उत्पादक शेतकर्याचा प्रपंच पूर्णपणे यावर अवलंबून होता. आज त्यांच्यासाठी समाधानकारक दिवस राहील. साईबाबाबांच्या आशिर्वादाने हार-फुले कायम चालू रहावे, अशी साईचरणी प्रार्थना असल्याची स्पष्टोक्ती माजी खा.डॉ सुजय विखे यांनी शिर्डीत दिली.
श्रीसाईबाबा समाधी मंदिरात फुले, हार व प्रसाद नेण्यास गुरुवारी सुरूवात झाली आहे. श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते एक नंबर प्रवेशद्वार येथे श्रीसाई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप सोसायटीच्या फुले, हार व प्रसाद विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर त्यांनी साईबाबा समाधीस फुलहार अर्पण केले. याप्रसंगी श्रीसाईबाबा संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, सुजित गोंदकर, साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात आदींसह शिर्डी ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. सन 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. तेव्हा मंदिरात फुले-हार-प्रसाद नेण्यासही बंदी घालण्यात आली. महामारीची तीव्रता कमी झाल्यावर 2021 मध्ये साईबाबा समाधी दर्शन सर्वसामान्यांसाठी खुले झाले. मात्र फुले हार प्रसाद विक्रीवरील बंदी कायम होती. त्यानंतर शिर्डी व परिसरातील फुले उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांकडून मंदिरात फुल-हार नेण्यास बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी होत होती.
शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती स्थापन केली. या समितीने कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुले, हार व प्रसाद विक्रीस व मंदिरात नेण्यास हरकत नसल्याचा अहवाल सादर केला. दरम्यानच्या काळात शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकर्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर 14 नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय येऊन मंदिरातील फुले-हार-प्रसाद नेण्याची बंदी उठविण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आज, दि.12 डिसेंबरपासून साईबाबा समाधी मंदिरापर्यंत प्रत्यक्ष फुले-हार-प्रसाद नेण्यास सुरूवात झाली आहे. आजचा दिवस गुरुवार असल्याने अनेक गोष्टी योगायोगाने जुळून आल्या. फुलांच्या शेतीवर प्रपंच अवलंबून असलेल्या शिर्डी व परिसरातील शेतकर्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे तालुक्यातील अस्तगांव, नांदुर्खी, कनकुरी, डोर्हाळे, राहाता, निमगाव, निघोज, कोर्हाळे, वाकडी तसेच शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
स्टॉल उभारणी अन् फुलांची खरेदी
पहिल्या दिवशी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने गेट नंबर 1, साईधाम इमारत व अद्यावत दर्शन रांगेसमोर असे तीन स्टॉल लावण्यात आले आहे. तर हजारो किलो झेंडू, गुलाब आणि सब्जाची खरेदी करण्यात आली आहे.

