शिर्डीत दर्शनबारीचे राजकारण! थोरात-विखेंमध्ये वेगवेगळे मतप्रवाह

शिर्डी – शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्यात साई संस्थान नेहमी आग्रही असते. असे असताना या सुविधेचा भाग म्हणून सुमारे 180 कोटी खर्च करून अद्ययावत अशी दर्शनबारी केवळ उद्घाटनाअभावी गेल्या काही दिवसांपासून पडून आहे. या दर्शनबारीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, अशी आग्रही भूमिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साई दर्शनासाठी येत असल्याने त्यांनी या दर्शनबारीचे उद्घाटन करावे असे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार ही साईभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याबद्दल राजकीय विधाने करणे टाळले पाहिजे. ते उद्घाटनाला येणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांना निमंत्रण दिले असून, त्यांनी ते स्वीकारलेही आहे. दर्शनबारीचे लवकर उद्घाटन व्हावे ही लोकांची भावना आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आपण जेव्हा एखादा प्रकल्प करतो, त्या प्रकल्पाच्या पाठीमागच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. राष्ट्रपती या देशातील सर्वोच्च व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत अशी काही विधाने करणे सोडून दिले पाहिजे, शेवटी ते राजकीय ज्येष्ठ नेते आहे. सत्ता गेल्याची अस्वस्थता प्रचंड आहे. त्यामुळे ते अशी विधान ते करत असतात. त्यांना एवढे गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. काही पक्षाचे नेते मुख्यमंत्री ठरू लागले आहेत. त्यासाठी संख्याबळ लागते. काही लोकांना स्वप्नरंजन करायला आवडत असते, असे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दर्शनबारीबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, योगायोगाने देशाच्या महामहिम राष्ट्रपती साई दर्शनासाठी येत आहेच. त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन भाविकांसाठी दर्शनबारी खुली होईल. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे असा माझा आग्रह आहे. पंतप्रधान उद्घाटनाला येणार असून, आता सहा महिने वाट पाहिली, अजून किती दिवस वाट पहायची. उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असेल तर कोणाचाही आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. मात्र, केवळ पंतप्रधान येणार आणि त्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं, म्हणून ते आतापर्यंत लांबविण्यात आले. एवढं मोठं काम झालेले असताना त्या कामाचा लाभ भाविकांना मिळत नाही, हेसुद्धा योग्य नाही. पाठ तर कधीही थोपटून घ्या, इथं येऊन थोपटून घ्या, तिथं जाऊन थोपटून घ्या. आमचं काहीही म्हणणं नाही.
मात्र, भाविकांची दर्शनबारीत उभं राहून शांततेने दर्शन घेण्याची संधी का घालवता, हे कळत नाही. ते काम पूर्ण झालेले असतानादेखील दर्शनाला उभे राहणे शक्य होते. परंतु पंतप्रधान येणार आणि उद्घाटन होणार यात ते लांबविण्यात आलं. यंदा प्रचंड कडक उन्हाळा होता. यामध्ये भाविकांना ती सुविधा मिळाली नाही. आता आम्ही किती दिवस वाट पाहणार. देशाच्या महामहिम येणार असतील, तर तीही आनंदाची पर्वणी आहे, असे मत माजी मंत्री थोरात यांनी व्यक्त केलं.साईबाबांची दर्शनबारी ही राजकीय आरोप-प्रत्यारोपात जाऊ लागली आहे. मात्र, भाविकांना तत्काळ साईबाबांचे दर्शन व्हावे याकरिता दर्शन बारी तत्काळ सुरू व्हावी, अशी अपेक्षा साईभक्तांनी व्यक्त करून दाखवली आहे.

