सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्ये धमाका: ‘ग्राउंड झीरो’मध्ये इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका

मुंबई – आपल्या फॅशनेबल स्टाईल आणि वैविध्यपूर्ण अभिनयाने नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना मोहून टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी ग्राउंड झीरो या चित्रपटात ती बॉलिवूड स्टार इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, सईच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सोशल मीडियावर हा धमाकेदार ट्रेलर व्हायरल होत आहे.
ग्राउंड झीरो हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, तो सत्य घटनेवर आधारित आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या गुप्त मोहिमेवर हा सिनेमा केंद्रित आहे. या चित्रपटात सई बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ही केवळ पत्नीची भूमिका नसून, एका जवानाला त्याच्या पत्नीचा खंबीर आधार कसा मिळतो, हे ती प्रभावीपणे दाखवणार आहे.
सईने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सशक्त भूमिका साकारल्या असून, त्या तितक्याच ताकदीने रंगवल्या आहेत. २०२५ हे वर्ष तिच्यासाठी बॉलिवूडमय तर आहेच, पण मराठी आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने काम करणारी अभिनेत्री म्हणून तिची नवी ओळख प्रस्थापित झाली आहे. मराठीतही ती तितक्याच जोमाने काम करताना दिसते. येत्या काळात ती देवमाणूस चित्रपटात प्रथमच लावणीवर थिरकताना दिसेल, तर गुलकंद आणि मटका किंगमध्येही तिची दमदार उपस्थिती जाणवेल. चाहत्यांसाठी ही खरोखरच पर्वणी ठरणार आहे!





