‘रिंगाण’ला साहित्य अकादमी पुरस्कार ! CM शिंदे म्हणतात,”मराठीचं रिंगाण..”

मुंबई – अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी ‘रिंगाण’ मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा- गावातील बदलत्या जीवनाचे नेमकं चित्रण करण्यात खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांसाठी प्रेरणा मिळणार आहे. लेखक, कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हातून यापुढेही अशीच दर्जेदार साहित्य सेवा घडत राहील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कृष्णात खोत हे रिंगण या कादंबरीचे लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. दरम्यान साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. त्याच पुरस्कारने कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगण या कादंबरीसाठी गौरविण्यात आलं.
साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 24 भाषांना दिला जातो. उर्दू, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, यात आसामी, बंगाली, डोगरी, कन्नड, मराठी आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. या भाषांमधील उत्कृष्ट साहित्याला या पुरस्काराने गौरविले जाते.





