Pune : पीएमपी चालकांना सुरक्षिततेचे धडे

पुणे : प्रवासांची सुरक्षितता लक्षात घेता पीएमपीएमएलमधील स्व-मालकीच्या चालकांसह ठेकेदारांच्या सर्व चालकांना अद्ययावत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोमवारपासून (दि.२३) टप्याटप्याने केंद्रीय सडक परिवहन संस्था (सीआयआरटी) येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई येथील कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या अपघातानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून तत्काळ बैठक घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेकेदारांसह चालकांना सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान, बुधवारी (दि. १८) पीएमपीच्या वतीने शहरातील आरटीओ, वाहतूक, पीएमपी, सीआयआरटी विभागासह तांत्रिक विभागातील अनुभवी माजी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये पीएमपीकडील सर्व चालकांना रस्ते वाहतुकीचे नियम व कायदे, प्रवाशांची सुरक्षितता, बसमधील तांत्रिक बाबींसह अन्य मुद्यावर प्रशिक्षण देणे महत्वाचे असल्याचा सूर निघाला. त्यानुसार सीआयआरटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या चालकांना प्रशिक्षण कशाप्रकारे द्यायचे याबाबत सविस्तर चर्चा झाली.
पीएमपीकडे स्वमालकीचे आणि ठेकेदार असे एकूण जवळपास दीड ते दोन हजार चालकांची संख्या आहे. या सर्व चालकांना टप्याटप्याने (५०ची एक बॅच) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये बसचालकाची मानसिक स्थितीसह प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असे वागावे, कसे बोलावे, रहावे यासह रस्ते वाहतुकीचे नियम काय, त्याचे कायदे काय, सीएनजी बस, इलेक्ट्रिक बस कशी चालवावी, कशी हातळावी यासह अन्य आवश्यक प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे.
या मुद्दयांवर देणार प्रशिक्षण
– रस्ते सुरक्षा, अपघात स्थिती आणि सुरक्षित
– मोटर व्हेईकल कायदा, नियम, तरतुदी
– रस्त्यावरील चिन्ह, दिशादर्शक फलक माहिती
– सुरक्षित वाहन चालविण्याची पाच प्रमुख वैशिष्ट्ये
– अपघाताची कारणे, प्रतिबंध आणि अभ्यास
– ब्लाइंट स्पाॅट, रहदारी रस्ते, शालेय परिसर
– प्रथमोपचार, आपत्कालीन स्थिती कशी हातळायची
– तणाव व्यवस्थापन, मानसिक स्थिती, योग आणि व्यायाम
– बसमधील इंजीन व तांत्रिक याची मूलभूत माहिती
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व चालकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये आठ ते दहा मुद्यांवर प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यामध्ये सातत्य ठेवण्यात येईल. हे प्रशिक्षण दोन दिवसाचे असेल. प्रवासी सेवा अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल





