डेहराडून : डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) मध्ये महाराष्ट्राच्या लेकीने नवीन इतिहास घडविला आहे. कोल्हापूरची सई जाधव ही डेहराडून येथील आयएमएमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली महिला टेरिटोरियल आर्मी अधिकारी ठरली आहे. या कामगिरीसह तिने या संस्थेची ९३ वर्षांची केवळ पुरुष अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची परंपरा मोडीत काढली आहे. २३ वर्षीय सई जाधवला १५७व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडमध्ये लेफ्टनंट म्हणून कमिशन देण्यात आले. १९३२ मध्ये स्थापन झालेल्या आणि तेव्हापासून लष्करी अधिकाऱ्यांच्या पिढ्या घडवणाऱ्या आयएमएसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. सई जाधवने प्रादेशिक सैन्याच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता लेफ्टनंट बनली आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा आणि एसएसबी मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर सई जाधवची निवड झाली होती. एमआयएमध्ये सहा महिन्यांचे आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कठीण होते. दरम्यान, सई जाधव ही देशसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या जाधव कुटुंबातील चौथी पिढी आहे. बेळगाव येथे शिक्षण आणि जडणघडण झालेल्या आणि मूळ कोल्हापूरच्या असलेल्या सईचे पणजोबा ब्रिटिश सेनेत, आजोबा भारतीय सैन्यात, वडील मेजर संदीप जाधव यांच्या सेवेच्या परंपरेला पुढे नेत सशस्त्र दलात नवा इतिहास घडवला आहे. पहिली महिला अधिकारी म्हणून अकादमीतून पदवी प्राप्त करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आता जेंटलमन कॅडेट ऐवजी ऑफिसर कॅडेट म्हणून संबोधले जाणे हा देखील एक ऐतिहासिक बदल आहे. हा क्षण केवळ कुटुंबासाठीच नाही तर ज्या कुटुंबाची मुली आज सैन्यात भरती होत आहेत, त्या प्रत्येक कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. – सई जाधव