सदाशिव पेठेतील हल्लाप्रकरण : ‘त्या’ तिघांना प्रत्येकी पाच लाखांचे रुपयांचे बक्षीस; पीडित तरुणीलाही मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत

पुणे – सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्याला पकडणाऱ्या तिघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. याशिवाय, पीडित तरुणीलाही 5 लाखांची मदत, तर तिच्या मित्रालाही वैद्यकीय उपचारांसाठी 25 हजारांची मदत देण्यात आली.
शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते शनिवारी शिवसेनेच्या सारसबाग येथील कार्यालयात या तीनही तरुणांना हे बक्षीस देण्यात आले. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह, डॉ. वाघमारे यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणीच्या घरी भेट देत तिलाही 5 लाख रूपयांची मदत देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तीनही तरुणांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना मुंबईत भेटण्यासही निमंत्रण दिले आहे.
लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तरुणांसह शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, किरण साळी, महिला आघाडी अध्यक्ष लीना पानसरे, पूजा रावेतकर, नीलेश घारे आणि प्रमोद प्रभुणे यावेळी उपस्थित होते. “तुम्ही दाखवलेले धैर्य अतुलनीय असून या आर्थिक मदतीतून तुम्हाला पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल,’ असा संदेश त्यांनी दिला.
हल्लेखोर कारागृहात
या प्रकरणात तरुणीवर हल्ला करणाऱ्या शंतनू लक्ष्मण जाधव (वय 21, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.
हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार : भानगिरे
एकतर्फी प्रेमातून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव युवतींना त्रास देत असल्यास अथवा तरुणींना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास या उद्देशाने शहर शिवसेनेच्या वतीने लवकरच हेल्पलाइन सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी माहिती दिली. पुढील काही दिवसांत हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची यंत्रणा पक्षाकडून उभारण्यात येत असल्याचे ते म्हणाले.




