नगर जिल्ह्यात साडेबाराशे तलाव कोरडेठाक

नगर: स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्याने अनेक दुष्काळ पाहिले आहेत; पण यावर्षीच्या दुष्काळाने कहरच केला आहे. 1972 च्या दुष्काळाची आठवण व्हावी, अशी परिस्थिती ओढवली आहे. दुष्काळाने हाहाकार माजवला असून पाण्याच्या एकेका थेंबासाठी जनता तडफडत आहे. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या शुन्य ते 100 हेक्‍टरपर्यंतचे सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, गाव तलाव व साठवण तलाव असे सर्वच्या सर्व 1 हजार 239 तलाव कोरडे ठणठणीत पडल्याने येथे पाण्याचा टिपूसही पाहायला मिळत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. दुष्काळी पट्ट्यात तर अनेकांनी स्थलांतर सुरू केले आहे. या भयावह परिस्थितीने जनतेला जगणंच नकोसं झालं आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थितीने हाहाकार उडाला आहे. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. कवडीमोल किमतीत पशुधन विकलं जात असून जगायचं कसं असा प्रश्‍न दुष्काळी पट्ट्यात सतावत आहे. या दुष्काळी पट्ट्यासह अन्य तालुक्‍यांतही हे चटके बसत आहेत. पाण्यासाठी तर जनता कासावीस आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्यामुळे जिल्ह्यातील तलाव व धरणांतील पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाकडून पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, यासह लघु पाटबंधारे तलाव, उपसा सिंचन योजना, साठवण किंवा वळवणी बंधारे, सिमेंट बंधारे शुन्य ते 100 हेक्‍टर सिंचन क्षमता असलेले तलाव उभारण्यात आले आहे. परंतू आज या तलावामध्ये एक थेंब देखील पाणी नाही. केवळ 1 हजार 239 तलाव आहे. ते सर्वच्या सर्व कोरडे पडले आहेत.

जिल्ह्यात 838 पाझर तलाव आहे. या तलावांमध्ये 190.90 दलघमी पाणी साठा होत असून 40 हजार 953 हेक्‍टर क्षेत्र सिंचनखाली येते. परंतु आज या तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही. 396 गाव तलाव आहेत. त्यात 15.11 दलघमी पाणीसाठा होतो. त्यामुळे 2 हजार 903 हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली येते. 4 साठवण तलाव असून त्यात 39 दलघमी पाणीसाठा होवून 84 हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली येते. परंतू आज या सर्व तलावांमध्ये एक थेंब देखील पाणी शिल्लक नाही. लघु पाटंबधारे प्रकल्प 1 असून त्यात 39 दलघमी पाणीसाठा होवून 90 हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली येते. यासर्व तलावांची अवस्था पाहिल्यानंतर कोरडे ठणठणीत आहेत.

अत्यल्प पावसामुळे यंदा जलसाठ्यांमध्ये असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाथर्डी, जामखेड, कर्जत, पारनेर तालुक्‍यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली. नागरिकांना पाण्यासाठी मैलो न मैल वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही. दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश पाझर तलाव कोरडे पडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेती व पिण्यासाठी मोठा आधार ठरणारे पाझर तलाव कोरडे पडले. पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेकडो एकर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत.

पिण्यासाठी पाणी नसल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने आज टॅंकरद्वारे पाणीपुरवठा शिवाय पर्याय राहिलेला नाही. छोटे-मोठे पाझर तलाव आहेत की गेल्या काही वर्षापासून पाणीच साठले नसल्यामुळे हे तलाव भेगाळले आहेत. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे उगवली असून तिही आता मरणासन्न झाली आहेत. वर्षानुवर्षे या तलावात गाळ साठल्यामुळे पाणी साठा होत नाही. तलावांची खोली कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रशासनाने या तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here