Virat Kohli Retirement : ‘तुझा तो भाव आजही माझ्या मनाला स्पर्श करतो…’, विराटच्या निवृत्तीवर सचिन भावुक

Sachin Tendulkar’s Emotional Tribute to Virat Kohli’s Test Retirement : विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर जगातील अनेक महान खेळाडू आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. विराट कोहलीला सर्वत्र शुभेच्छा मिळत आहेत. विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. अशात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराटला शुभेच्छा देताना १२ वर्षांपूर्वीच्या एका खास गोष्टीच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
सचिनने १२ वर्षांपूर्वीच्या आठवणीला दिला उजाळा –
विराटच्या कसोटी निवृत्तीवर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिलं, “जेव्हा तू कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीस, तेव्हा मला बारा वर्षांपूर्वीची ती सुंदर आठवण पुन्हा जागी झाली, जेव्हा मी माझा शेवटचा कसोटी सामना खेळलो होतो. त्या वेळी तू मला तुझ्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ एक धागा भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती तुझ्यासाठी खूप खास आणि खासगी गोष्ट होती, म्हणून मला ती स्वीकारणं योग्य वाटलं नाही. पण तुझा तो भाव आजही माझ्या मनाला स्पर्श करतो.”
View this post on Instagram
माझ्याकडे तुला देण्यासाठी कोणता धागा नाही – सचिन तेंडुलकर
त्यांनी पुढे लिहिलं, “माझ्याकडे तुला देण्यासाठी कोणता धागा नाही, पण माझ्या मनातून तुझ्यासाठी प्रचंड आदर आणि शुभेच्छा आहेत. विराट, तुझा खरा वारसा हा आहे की तू देशातील असंख्य तरुणांना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली आहेस. तुझी कसोटी कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. तू फक्त धावा नाही केल्या, तर भारतीय क्रिकेटला एक नवी ओळख, नवीन ऊर्जा आणि नवे चाहते दिले आहेस. तुझ्या या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी तुझे मनापासून अभिनंदन.” सचिनची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा – Virat Kohli retirement : विराटचा उल्लेख करत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज
सचिनसोबत विराटचे खास क्षण –
विराट कोहलीने २००८ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. त्यावेळी सचिन हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात सचिन तेंडुलकरसह विराट कोहलीने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर, त्याने कसोटी स्वरूपातही सचिनसोबत अनेक संस्मरणीय क्षण घालवले आहेत.





