Sachin Sawant : शब्द फिरवणे हा मुख्यमंत्र्यांचा छंद; काँग्रेस नेते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले वचन कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, याकरिता शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. तर, माजी आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनही केले. या पार्श्वभू्मीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, योग्यवेळी हा निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल, असे उत्तर दिले.
यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. शब्द फिरविणे हा मुख्यमंत्र्यांचा छंदच असल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभेत टर्निंग पॉइंट ठरली. त्याचप्रमाणे, शेतकरी कर्जमाफीचीही घोषणा करण्यात आली होती.
परंतु महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेले नाही, असे म्हणत हात झटकले होते. कर्जमाफी देण्यासारखी राज्य सरकारची परिस्थिती नाही, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फडण्याचा सल्ला दिला होता. याच प्रश्नावर माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते.





