Sachin Ghaywal: परदेशातून ‘फेस टाइम’वर गेम प्लॅनिंग? घायवळ बंधूंचा सर्वात पर्दाफाश; पोलिसांच्या हाती लागले पुरावे
Sachin Ghaywal: फरार असताना कामगाराच्या एटीएम कार्डाचा केला वापर; तांत्रिक विश्लेषणातून घायवळ बंधूंचे 'फेस टाइम' कनेक्शन उघड

Sachin Ghaywal – कोथरूडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार प्रकरणात परदेशात पळून गेलेला कुख्यात आरोपी नीलेश घायवळचा भाऊ सचिन गायवळसोबत ‘फेस टाइम ऍप’ वरून संपर्कात होता, तसेच फरार असताना आपल्या कामगाराचे एटीएम कार्ड वापरत होता, अशी माहिती पुणे पोलिसांनी विशेष मोक्का न्यायालयात दिली. सचिन घायवळकडून चार मोबाइल, एक लॅपटॉप आणि पाच पेनड्राइव्ह जप्त केले असून, त्यांची तपासणी सुरू असल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, न्यायालयाने सचिन च्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. घायवळ टोळीचा प्रमुख नीलेश घायवळ आणि वादग्रस्त शस्त्र परवान्यामुळे चर्चेत आलेल्या सचिन घायवळसह एकूण १३ आरोपींविरोधात मोक्कासह विविध कलमांनुसार कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर कोथरूडमधील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्यासह विविध पाच गुन्हे घायवळ बंधूंवर दाखल आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर पुण्यातून पसार झालेल्या सचिनला पुणे पोलिसांनी गेल्या बुधवारी राजस्थानातून अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
त्या वेळी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आणि तपास अधिकारी सहायक आयुक्त शैलेश संखे यांनी तपासातील प्रगती सांगितली. आरोपी सचिन घायवळचे मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राइव्हचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, त्यातून महत्त्वाचा पुरावा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आरोपी फरार असताना वापरत असलेल्या मोबाइलचे क्रमांक मिळाले असून, त्यांचेही तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. आरोपीच्या स्थावर मालमत्तांच्या खरेदी-व्यवहारांची माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी नीलेश घायवळसह फरार असलेल्या चार आरोपींना अटक करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील हिरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.





