Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यामाचा मास्टरमाइंड भाजपच
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा झालेला शपथविधी आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Sunetra Pawar : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी,
पण या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार हा भारतीय जनता पक्षच असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र सामनातून करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत सुतकी काळातच सुनेत्रा पवारांचा झालेला हा शपथविधी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण व्हावे, अशी भावना जनमानसात होती. मात्र, भाजप नेतृत्वासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना हे ऐक्य नको असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
सामनाच्या मते, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना पुसटशी कल्पनाही न देता सुनेत्रा पवारांना मुंबईत आणून शपथ दिली गेली. यामागे कौटुंबिक कलह कायम ठेवण्याचा आणि पवार नावाचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा भाजपचा कुटील डाव आहे.
अग्रलेखात पुढे असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित दादांनंतर सत्तेसाठी मोठी चढाओढ सुरू होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले असून, पक्षाची धुरा पटेल यांच्या हातात जाऊ नये म्हणूनच सुनेत्रा पवारांना पुढे करण्यात आले आहे.
मात्र, सुनेत्रा पवार या केवळ नावापुरत्या उपमुख्यमंत्री असून सत्तेचे खरे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असणार आहे. एकीकडे हिंदुत्वाचा डंका पिटणारा भाजप, पतीच्या निधनानंतरचे विधी पूर्ण होण्याआधीच सुनेत्रा पवारांना सत्तेच्या खुर्चीवर बसवून नेमका कोणता धर्म पाळत आहे, असा बोचरा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.






