SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

मुंबई : बुलावायोच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर एक इनिंग आणि 236 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कर्णधार वियान मुल्डरच्या नाबाद 367 धावांच्या खणखणीत खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2-0 ने खिशात टाकली आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला.
दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्डब्रेक
सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्व्हिनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली असली, तरी अवघ्या 24 धावांवर 2 विकेट गमावल्यानंतर वियान मुल्डर आणि डेव्हिड बेडिंघम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची मजबूत भागीदारी रचली. त्यानंतर मुल्डरने ल्हुहान-ड्रे प्रिटोरियससोबत 200+ धावांची आणखी एक भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत नेले. दक्षिण आफ्रिकेने 626/5 वर डाव घोषित केला.
झिम्बाब्वेचा पहिला डाव केवळ 170 धावांवर आटोपला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही झिम्बाब्वे 220 धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
ऐतिहासिक विक्रमाची नोंद
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सलग 10 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. असा विक्रम करणारी ती तिसरीच टीम ठरली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोनदा सलग 16-16 सामने आणि वेस्ट इंडिजने सलग 11 सामने जिंकले आहेत. 1889 पासून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 136 वर्षांनंतर प्रथमच सलग 10 टेस्ट जिंकण्याचा मान मिळवला. वियान मुल्डरच्या नेतृत्वाखालील या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात नवा अध्याय रचला आहे.





