SA vs NZ : मार्को यान्सनची ईडन गार्डन्सवर तुफानी फिफ्टी! १६ वर्षांनंतर मोडला ‘हा’ मोठा विक्रम
SA vs NZ : सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यान्सनने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ३० चेंडूंत नाबाद ५५ धावांची तडाखेबंद खेळी केली.

SA vs NZ Marco Jansen fifty : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात सापडलेला असताना अष्टपैलू मार्को यान्सन याने झुंजार फलंदाजी करत संघाला सावरले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यान्सनने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ३० चेंडूंत नाबाद ५५ धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ८ बाद १६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवले आहे.
१६ वर्षांनंतर ऐतिहासिक पराक्रम –
टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यात सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर येऊन अर्धशतक ठोकणारा मार्को यान्सन हा जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. तब्बल १६ वर्षांनंतर असा कारनामा कोणाला तरी जमला आहे. यापूर्वी २०१० च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमध्ये २४ चेंडूंत नाबाद ६० धावा केल्या होत्या. यान्सनने २७ चेंडूंत आपली अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या डावात ५ षटकार आणि २ चौकार ठोकले.
कठीण परिस्थितीत यान्सन-स्टब्सची भागीदारी –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या १२ धावांवर त्यांचे दोन गडी बाद झाले होते. कोल मॅकॉन्चीने क्विंटन डिकॉक (१०) आणि रायन रिकलटन (०) यांना एकाच षटकात बाद करून धक्का दिला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस (३४), एडन मारक्रम (१८) आणि डेव्हिड मिलर (६) हे देखील स्वस्तात परतले आणि आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७७ अशी बिकट झाली होती.
टी-२० विश्वचषक नॉकआउट: ७ व्या क्रमांकावरील सर्वात मोठ्या खेळी –
अशा वेळी मार्को यान्सन आणि ट्रिस्टन स्टब्स (२९) या जोडीने सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. स्टब्सने २४ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकार लगावला. डावाच्या १९ व्या षटकात यान्सनने सलग दोन षटकार खेचून आपले टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक साजरे केले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.





