S.Jaishankar : पाकचा तिळपापड; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणावर पाकिस्तानकडून प्रत्युत्तर

संयुक्त राष्ट्रे : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील भाषणामध्ये पाकिस्तानवर केलेल्या प्रतिक्रियेवर पाककडून दिलेल्या प्रत्युत्तरावर भारताने टीका केली आहे. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानचा उल्लेख न करता दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. सीमापार दहशतवादाचे आपले दीर्घकाळापासूनचे धोरण असल्याचे पाकिस्तानकडून मान्य केले गेले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सूचित केले होते. जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे मूळ एकाच देशाशी संबंधित असल्याचे आढळून येते.
भारताचा शेजारी देश हा जागतिक पातळीवरील दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून या दहशतवादी कारवायांचा सामना करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. संध्याकाळी प्रत्युत्तराच्या अधिकारामध्ये पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने भारत दहशतवादाचे बदनामी करणारे आरोप करून पाकिस्तानची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप केला. जयशंकर यांनी आपल्या भाषणात दहशतवादाबाबत बोलताना कोणत्याही देशाच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. तरी त्यांचे आरोप पाकिस्तानशी संबंधित होते, असा आरोप पाकिस्तानच्यावतीने केला गेला. भारताने केवळ पुन्हा खोटेपणासाठी हे आरोप केल्याचे पाक शिष्टमंडळाने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या आक्षेपांना बारतानेही उत्तराच्या अधिकारात प्रत्युत्तर दिले आहे. ज्या शेजाऱ्याचे नाव घेतले गेले नाही त्याने प्रतिसाद देणे आणि सीमापार दहशतवादाच्या त्यांच्या दीर्घकालीन पद्धतीची कबुली दिल्यासारखेच असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानची प्रतिमाच त्या देशाची ओळख आहे. अनेक भौगोलिक क्षेत्रांमधील दहशतवादी कृत्यांमध्ये पाकच्या बोटांचे ठसे पुरेसे बोलके आहेत. हे केवळ त्याच्या शेजाऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी धोका आहे, असे संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमधील द्वितीय सचिव रेंटला श्रीनिवास म्हणाले. कोणताही युक्तिवाद किंवा असत्य कधीही दहशतवाद्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालू शकत नाही, असे श्रीनिवास म्हणाले. पाकिस्तानी प्रतिनिधी पुन्हा एकदा प्रतिसाद देण्यासाठी सभागृहात आला, परंतु पाकिस्तानी प्रतिनिधी बोलत असताना श्रीनिवास सभागृहातून बाहेर पडले.
दहशतवादाचा एकमुखी निषेध करण्याचे आवाहन
जयशंकर यांनी आपल्या भाषणात दहशतवादाचा एकमुखी निषेध करण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केले होते. जिथे दहशतवादाचे केंद्र औद्योगिक स्तरावर कार्यरत असतात आणि दहशतवाद्यांचा सार्वजनिकरित्या गौरव केला जातो. जे देश दहशतवादाला आपले परराष्ट्र धोरण मानतात, त्या देशांचा निषेध करावा, असे आवाहन जयशंकर यांनी केले होते. दहशतवादाच्याअर्थकारणाची कोंडी करावी आणि प्रमुख दहशतवाद्यांवर निर्बंध घालावेत. दहशतवादाच्या संपूर्ण व्यवस्थेवर आणि जे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांवर दबाव आणावा असे आवाहन देखील त्यांनी केले होते. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्यांमध्ये एकाच राष्ट्रीयत्वाने भरलेले आहेत. पहलगामचा हल्ला हे सीमापार दहशतवादाचे उदाहरण आहे. आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी आणि दहशतवाद्यांना शिक्षा करण्यास भारताला अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.





