S. Jaishankar : भारत-जपान भागीदारी अधिक मजबूत होणार; एस. जयशंकर यांनी घेतली जापानी वरिष्ठ नेत्यांची भेट
भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक, आर्थिक तसेच ऊर्जा सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी गुरुवारी भर दिला.

S. Jaishankar : भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक, आर्थिक तसेच ऊर्जा सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी गुरुवारी भर दिला. जपानच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक करण्याबाबत चर्चा झाली.
भारत-जपान चौथ्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय ‘२+२ संवादासाठी’ जपान दौऱ्यावर असलेल्या जयशंकर (S. Jaishankar) यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) उपाध्यक्ष तारो आसो यांची भेट घेतली. ही भेट आनंददायी असल्याचे सांगत, सरकार, उद्योग आणि नागरिकांच्या स्तरावर भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या आसो यांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.
दोन्ही देशांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्याच्या गरजेवर सहमती झाल्याचे जयशंकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले. त्यांनी एलडीपी मुख्यालयात जपानचे माजी परराष्ट्र मंत्री तारो कोनो यांचीही भेट घेतली. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या ‘२+२’ संवादात भारताच्या वतीने जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होतील. जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि संरक्षण मंत्री शिनजिरो कोइझुमी हे जपानचे प्रतिनिधित्व करतील.
या बैठकीत संरक्षण, सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींवर चर्चा होणार आहे. मुक्त, खुले आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी दोन्ही देशांची सामायिक वचनबद्धता अधिक मजबूत करण्यावरही भर दिला जाणार आहे. भारत आणि जपान यांच्यात विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी असून, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत दोन्ही देशांचे सहकार्य (S. Jaishankar) विस्तारत आहे.






