Ruturaj Gaikwad Century : पुण्याच्या पठठ्याने मारलं मैदान! ऋतुराजने अवघ्या इतक्या डावात झळकावलं पहिलं वनडे शतक

Ruturaj Gaikwad slams maiden ODI century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना ३ डिसेंबर रोजी खेळला जात आहे. रायपूरच्या शहिद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमव खेळल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित-जैस्वाल स्वस्तात बाद झाले. यानंतर ऋतुराज गायकवाडने पहिले वनडे शतक झळकावत भारताचा डाव सावरला.
ऋतुराज गायकवाडने ठोकले पहिले वनडे शतक –
रायपूरच्या या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून सर्वांना प्रभावित केले. केवळ ७७ चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. गायकवाडच्या या शानदार खेळीत १२ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे टीम इंडियाने सामन्यात दमदार पुनरागमन केले आणि धावफलकावर वर्चस्व प्रस्थापित केले.
कारकिर्दीतील अवघ्या ८व्या वनडे सामन्यात ठोकलं शतक –
📸📸 Ruturaj’s Raipur Ton 💯
Relive his knock here 🎥🔽https://t.co/L9POFdCslU#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9MCf7UlQGr
— BCCI (@BCCI) December 3, 2025
यापूर्वी रांची येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाडचा फॉर्म निराशाजनक होता. त्या सामन्यात तो केवळ ८ धावा काढून बाद झाला होता. मात्र, आता आपल्या कारकिर्दीतील अवघ्या ८व्या वनडे सामन्यात त्याने पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करून आपली क्षमता सिद्ध केली. गायकवाडने टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी यापूर्वीच शतक झळकावले आहे, पण वनडेमधील त्याचे हे पहिले शतक अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
मार्को यान्सेनने केली खेळीची समाप्ती
शतक पूर्ण झाल्यानंतर गायकवाड जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. त्याने ८३ चेंडूंमध्ये १०५ धावांची खेळी केली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनने त्याला बाद केले. गायकवाडच्या या शानदार शतकी खेळीमुळे तो टीम इंडियात एक भरवशाचा खेळाडू म्हणून सिद्ध झाला आहे आणि चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल खूप उत्साह निर्माण झाला आहे.





