रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मानले नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार

मॉस्को – युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबवण्याच्या उदात्त हेतूसाठी प्रयत्न केल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. युक्रेन युद्धाला थांबवण्याच्या दृष्टीने युद्धबंदीच्या प्रस्तावाबाबत पुतीन यांनी गुरुवारी पहिल्यांदाच उघड प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी मोदी आणि ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
युद्धबंदीला रशियाची तयारी आहे. मात्र या युद्धबंदीच्या अटींबाबत स्पष्टता असायला हवी, असे पुतीन यांनी म्हटले आहे. /क्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये अल्पकाळासाठी युद्ध थांबवण्याच्या उपाययोजनांमध्ये आपल्याला स्वारस्य नाही. त्याऐवजी संघर्षाची मूळ कारणे दूर करण्याबाबत चर्चा करण्यातच आपण उत्सुक आहोत, असे पुतीन गेल्या वर्षी जुलैमध्येच म्हणाले होते.
अमेरिका आणि युक्रेन दोन्ही देशांनी सौदी अरेबियामध्ये झालेल्या चर्चेनंतर किमान ३० दिवसांच्या अस्थायी युद्धबंदीला पाठिंबा दर्शवला आहे. युक्रेनच्या या प्रस्तावाचे विश्लेषण करण्यापुर्वी या युद्धबंदीसाठी प्रयत्न ककरणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आबार आपल्याला मानायचे आहेत, असे पुतीन म्हणाले.
अनेक विषयांवर चर्चा करायची आहे. मात्र त्यासाठी चीनचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, ब्राझील आणि दक्षिण आप्रिकेचे अध्यक्ष खूप वेळ खर्च करत आहेत. या सर्वांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. कारण त्यांच्या प्रयत्नातून युद्ध थांबवण्याचे आणि मानवी जीविताची हानी रोखण्याचे उदात्त ध्येय साध्य होते आहे, असे पुतीन म्हणाले.
दुसरे म्हणजे शत्रुत्व संपवण्यास आम्ही तयार आहोत. मात्र या युद्धबंदीतून दीर्घकालीन शांतता निर्माण व्हावी आणि संघर्षाचे मूळ कारण दूर व्हायला हवे, असेही ते म्हणाले.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की या दोघांशीही अनेकवेळा फोनवरून चर्चा केली आहे. गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्यावेळी देखील रशिया-युक्रेन संघर्षावरच्या मुद्यावर भारत तटस्थ नाही, भारत शांततेच्या बाजूने आहे, या भूमिकेवर पंतप्रधान मोदी यांनी विशेष भर दिला होता. सध्याचे युग युद्धाचे नाही, असे मोदींनी पुतीन यांनाही यांनाही सांगितले होते.





