रशियन हवाईदलाचे विमान इमारतीवर कोसळले; वैमानिक थोडक्यात बचावले; २ रहिवासी ठार

पॅरिस : रशियामध्ये एक युद्ध विमान रहिवासी भागामध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे युद्ध विमान सी ऑफ अझीव्ह प्रांतामधील किनारपट्टीवरील शहरातील एका इमारतीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्या असून या अपघातामध्ये नऊ मजली इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही म्हटले जात आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने सू-३४ हे युद्ध विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती दिली आहे. प्रशिक्षणाअंतर्गत केलेल्या उड्डाणादरम्यान या विमानातील दोन इंजिनपैकी एका इंजिनाला आग लागल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे इजेक्ट झाल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र विमान रहिवासी इमारतीवर आदळल्याने विमानातील इंधनाचा स्फोट झाला.
स्थानिक आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक प्रशासनाने या अपघातानंतर जवळच्या रुग्णालयामध्ये काही खोल्या या अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवल्या असून हवाई रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. या अपघातामुळे १७ फ्लॅट्सचं नुकसान झालं आहे. इमारतीमधील १०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.





