Ilham Aliyev : रशियाने अजाणतेपणी विमानाला लक्ष्य केले; अझरबैजानच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट

बाकू, (अझरबैजान) : गेल्या आठवड्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या अझरबैजानच्या विमानाला रशियाकडून अजाणतेपणी लक्ष्य करण्यात आल्याचे अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियेव यांनी म्हटले आहे. ही सावरासावर करतानाच रशियाकडून काही दिवसांपर्यंत या प्रकरणाला मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे विमान रशियाकडून पाडले गेले होते. हे अगदी स्पष्ट आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक केले गेले, असे आम्ही म्हणत नाही. मात्र हे रशियाकडून केले गेले होते, असे अलियेव यांनी सरकारी वृत्तवाहिनीला सांगितले. कझाकस्तानमध्ये कोसळलेल्या विमानाला रशियाच्या भूमीवरूनच लक्ष्य करण्यात आले होते. अनियंत्रित इलेक्ट्रॉनिक युद्धसामुग्रीद्वारे या विमानावर मारा केला गेला होता. तरी रशियाने काही दिवसांपर्यंत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही त्यांनी केला.
पहिल्या तीन दिवसांपर्यंत रशियाकडून या संदर्भात काहीही व्याच्यता केली गेली नाही. नव्हती. रशियाच्या अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्यांबाबत आपल्याला आश्चर्य वाटते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ देखील झाल्याचेही ते म्हणाले. या दुर्घटनेबद्दल अझरबैजानने रशियाकडून माफी, गुन्ह्याची कबुली आणि संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी.
याशिवाय अझरबैजानला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही केली गेली आहे. रशियाचच्या हवाई संरक्षण प्रणालीने मारा केल्याने अझरबैजानचे विमान कझाकस्तानमध्ये कोसळले होते. त्या विमानातल्या ६७ पैकी ३८ प्रवासी ठार झाले होते.





