झेलेन्स्कींचे ब्रिटीश संसदेत भाषण म्हणाले, रशियन हल्ल्यांपुढे युक्रेन झुकणार नाही

रशिय-युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनवर रशियन केलेल्या हल्ल्याचा आज 14 वा दिवस आहे. 14 दिवसांनंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत. राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसत आहे. या सगळ्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटिश संसदेत भाषण केले आणि युक्रेन रशियन हल्ल्यांपुढे झुकणार नाही, असे सांगितले. दरम्यान, झेलेन्स्की यांनी रशियाला ‘दहशतवादी देश’ म्हणून घोषित करण्याची विनंती देखील यावेळी बोलताना केली आहे.
ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून कनिष्ठ सभागृह ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ला संबोधित करताना अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘ऐतिहासिक’ भाषण केले. यावेळी सर्वा खासदारांनी उभं राहून झेलेन्स्की यांचे स्वागत केले.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना उद्देशून झेलेन्स्की म्हणाले की, “आम्हाला पाश्चात्य देशांना सहकार्य करण्यासाठी तुमची मदत हवी आहे. या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि बोरिस, मी तुमचा आभारी आहे. ”
पुढे ते म्हणाले “आता आमच्यासाठी असणं किंवा नसणं हा प्रश्न आहे. हा प्रश्न 13 दिवस विचारला गेला असता, पण आता मी तुम्हाला निश्चित उत्तर देऊ शकतो. हे नक्कीच होय आहे, आणि मी तुम्हाला युनायटेड किंग्डमनं आधीच ऐकलेल्या शब्दांची आठवण करून देऊ इच्छितो. आम्ही हार मानणार नाही, आम्ही हरणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू. समुद्रात, हवेत, आम्ही आमच्या भूमीसाठी लढू, काहीही झालं तरी. आम्ही जंगलात, शेतात, काठावर, रस्त्यांवर लढू”
“कृपया या देशावर (रशिया) निर्बंध वाढवा आणि कृपया या देशाला दहशतवादी राज्य घोषित करा. आमच्या युक्रेनचे आकाश सुरक्षित राहतील याची खात्री करा” ते म्हणाले, “माझा देश रशियाच्या आक्रमणाविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन.”




