Russia Ukraine War: जीव वाचवण्यासाठी सव्वा लाख नागरिकांनी उचलले हे पाऊल

वारसॉ – युद्धग्रस्त युक्रेनमधून आतापर्यंत किमान 1 लाख 20 हजारांच्या आसपास शरणार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारील देशांमध्ये पलायन केले आहे. रशियामुळे केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये प्रचंड अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भयभीत झालेले नागरिक मिळेल त्या मार्गाने युक्रेनमधून बाहेर पळ काढायला लागले आहेत. येत्या काही काळात शरणार्त्यांची ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थ्यांच्या एजन्सीने म्हटले आहे.
नागरिक आपले जमेल तेवढ्या चीजवस्तू घेऊन पळ काढायला लागले आहेत. रशियन फौजांकडून छळ होऊ नये, या बीतीपोटी हे पलायन सुरू आहे. रशियन फोजा राजदानी किव्हमध्ये घुसल्याच्या पार्श्वभुमीवर या पलायनाचे प्रमाण वाढले आहे, असे या एजन्सीने म्हटले आहे.
आतापर्यंत 1 लाख 16 हजार नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आहे. ही संख्या दररोज वाढत चालली आहे, असे संयुक्त राष्ट्र निर्वासितांच्या उच्चायुक्तांच्या प्रवक्त्या शबिया मंटू यांनी सांगितले. ही परिस्थिती भविष्यात आणखीन बिघडली तर किमान 40 लाख निर्वासित युक्रेन सोडून पळून जातील, असा अंदाज या एजन्सीने व्यक्त केला आहे.
स्थलांतरीतांचे लोंढे…!
पोलंड, मोल्दोव्हा, हंगेरी, रोमानिया आणि स्लोव्हाकिया यासारख्या बहुतेक शेजारील देशांमध्ये हे निर्वासित जात आहेत. रशियन सैन्याने जेथून युक्रेनमध्ये घुसखोरी केली, त्या बेलारुसमध्येही काही जण आश्रय घेण्साठी जात आहेत. यातील कोणत्या देशात किती निर्वासित गेले याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र पोलंडमध्ये सर्वाधिक 20 लाख जणांनी अलिकडील काळात आश्रय घेतला आहे. रशियाने 2014 मध्ये युक्रेनमध्ये घुसखोरी केली होती. तेंव्हापासून हे निर्वासित पोलंडमध्ये स्थलांतर करू लागले होते. मात्र गेल्या 48 तासात युक्रेनमधून किमान 1 लाख जणांनी पोलंडमध्ये आश्रय घेतल्याचे पोलंड सरकारने म्हटले आहे.




