Russia Killer Virus: रशियात ‘किलर व्हायरस’ची दहशत! महिलेचा मृत्यू, 5 रुग्णालये सील ; शेकडो जण क्वारंटाईन
Russia Killer Virus: रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील एका संशोधन प्रयोगशाळेत काम करणाऱ्या महिला तंत्रज्ञाच्या मृत्यूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

Russia Killer Virus: रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील एका संशोधन प्रयोगशाळेत काम करणाऱ्या महिला तंत्रज्ञाच्या मृत्यूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. २८ वर्षीय प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा मृत्यू न्यूमोनिक प्लेगमुळे झाला. पाच रुग्णालये बंद करण्यात आली असून शेकडो लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मृत महिलेची ओळख दार्या शिपिलोवा अशी पटली असून, ती शेलेखोव्ह शहरातील प्लेग-विरोधी संशोधन संस्थेत काम करत होती. चाचणीसाठी नमुने गोळा करत असताना, तिच्या हातून चुकून जिवाणू असलेली एक टेस्ट ट्यूब फुटली आणि तिला या प्राणघातक संसर्गाची लागण झाली.
न्यूमोनियाची गंभीर लक्षणे दिसू लागल्याने दार्या शिपिलोवाला २९ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, परंतु १ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
न्यूमोनिक प्लेग अत्यंत संसर्गजन्य असून तो हवेतून वेगाने पसरतो. त्यावर त्वरित उपचार न केल्यास तो लवकरच प्राणघातक ठरू शकतो. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तात्काळ पाच रुग्णालयांमधील कामकाज स्थगित केले. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांच्या संपर्कात आलेल्या शेकडो लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
२०० लोकांना विलगीकरणात ठेवले Russia Killer Virus:
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, सायबेरियातील इर्कुत्स्क प्रदेशात एका महिलेच्या मृत्यूमुळे साथीच्या रोगाचा धोका वाढला आहे. सुरुवातीला, त्या महिलेचा मृत्यू प्लेगमुळे झाल्याचा संशय होता. खबरदारीचा उपाय म्हणून, सुमारे २०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आणि शहरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.
त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांवर पाळत वाढवली Russia Killer Virus:
मात्र, इर्कुत्स्क प्रदेशाचे गव्हर्नर इगोर कोबझेव्ह यांनी नंतर टेलिग्रामवर स्पष्ट केले की, त्या महिलेचा मृत्यू धोकादायक संसर्गामुळे नव्हे, तर अज्ञात कारणामुळे झालेल्या न्यूमोनियामुळे झाला. त्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान रुग्णाच्या नमुन्यात कोणतेही संशयास्पद सूक्ष्मजीव आढळले नाहीत.
शिवाय, गेल्या १० दिवसांत त्या ठिकाणी काम करणाऱ्या इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे निदान झालेले नाही. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सध्या अत्यंत सतर्क आहेत. पीडित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांच्यावर दररोज वैद्यकीय तपासणी आणि देखरेख ठेवली जात आहे.


