इस्टर युद्धबंदीचे रशियाकडूनच उल्लंघन; झेलेन्स्की यांचा आरोप

किव्ह : रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी स्वतःहून जरी इस्टरच्या निमित्ताने अंशकालीन युद्धबंदी घोषित केली असली, तरी या कालावधीमध्ये रशियाकडून हल्ले अधिक तीव्र करण्यात आले आहे. रशियानेच युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी रशियाने नव्याने केलेल्या हल्ल्यांचा तपशील दिला आहे.
रशियाच्या सैन्याकडून गोळीबार आणि कामिकाझे ड्रोनचा वापर वाढला आहे; पोकरोव्स्क आणि सिव्हर्स्कच्या दिशेने सर्वात जास्त मारा केला जातो आहे आणि ईस्टरच्या दिवशी मध्यरात्री ते दुपारच्या दरम्यान २६ हल्ले केले असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. पुतीन यांनी स्वतःच युद्धबंदी घोषित केली आणि या युद्धबंदीचे उल्लंघन देखील केले. या प्रत्येक हल्ल्याचे पुरावे आम्ही आमच्या भागीदारांना उपलब्ध करून देणार आहोत.
एकतर पुतीन यांचे त्यांच्या सैन्यावर पूर्ण नियंत्रण नाही किंवा रशियाचा युद्ध संपवण्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने पाऊल उचलण्याचा कोणताही हेतू नाही, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. इस्टरनंतर किमान ३० दिवसांसाठी रशियाने पुर्णपणे युद्धबंदीचे पालन करावे, यासाठी जागतिक समुदायाने रशियावर दबाव आणावा. कारण आपल्याला रशियावर भरवसा राहिलेला नाही, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.





