अधिक घातक शस्त्रे वापरण्याचा रशियाचा इरादा

किव्ह – युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाकडून अधिक घातक शस्त्रे वापरली जाण्याची भीती युक्रेन आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सामुहिक हिंसा आणि व्यापक नुकसान करण्यासाठी रशियाकडून संहारक शस्त्रे वापरली जाण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या पूर्वेकडील भागावर ताबा मिळवण्यासाटी रशियाकडून जमिनीवरील लक्ष्यांसाठी जहाजभेदी क्षेपणास्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जाऊ लागली आहे, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
केएच-22 ही क्षेपणास्त्रे रशियाकडून 1960 पासून वापरात आहेत. या क्षेपणास्त्रांचा प्रमुख उद्देश विमानवाहू युद्धनौकांना लक्ष्य करणे हा आहे. मात्र जमिनीवरील लक्ष्यावर मारा केल्यास या क्षेपणास्त्रांकडून व्यापक संहार केला जाऊ शकतो. त्यामुळे मोठी जीवितहानीही होऊ शकते.
सध्या रशियाकडील अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची संख्या मर्यादित असल्यामुळे आता 5.5 टन वजनाच्या जहाजभेदी क्षेपणास्त्रांचा वापर शक्य असल्याचे ब्रिटीश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र रशियाने ही क्षेपणास्त्रे कोठे मारा करण्यासाठी तैनात केली आहेत, याचा कोणताही तपशील या अधिकाऱ्यांनी दिला नाही.
युक्रेनच्या पूर्व भागातील डोनबासमध्ये कोळशाच्या खाणी आणि फॅक्टऱ्या आहेत. या भागात जोरदार लढाई सुरू झाल्यामुळे या सर्व उद्योग प्रकल्पांवर मोठा ताण येऊ लागला आहे. युक्रेनच्या उर्जा स्रोतांवर आणि साठ्यांवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत.





