रशियाने आणखी एक युक्रेनियन शहर ताब्यात घेतले, सैन्याने कुप्यान्स्कचा व्हिडिओ केला शेअर; झेलेन्स्कीला मोठा धक्का

मॉस्को/कीव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेपूर्वी रशियाने युद्धाच्या रणांगणावर मोठी खेळी केली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने शनिवारी अधिकृत घोषणा करत खार्किव प्रांतातील महत्त्वपूर्ण शहर असलेल्या कुप्यांस्कवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या विजयाचे प्रतीक म्हणून रशियन लष्कराने शहराचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला असून, या घटनेमुळे युक्रेनला मोठा लष्करी आणि राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील लष्करी गटाच्या सहाव्या गार्ड्स संयुक्त दलाने कुप्यांस्क शहरातून युक्रेनी सैन्याला हुसकावून लावले आहे. सध्या रशियन सैनिक शहराच्या कानाकोपऱ्यात, इमारतींमध्ये आणि तळघरांमध्ये लपून राहिलेल्या उर्वरित युक्रेनी गटांचा शोध घेत असून ते भाग सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत युक्रेनी सैन्याने कुप्यांस्कमध्ये पुन्हा शिरकाव करण्याचे तीन मोठे प्रयत्न केले, मात्र रशियन सैन्याने ते सर्व हल्ले परतवून लावल्याचे मॉस्कोकडून सांगण्यात आले आहे.
🇷🇺 Russian 6th Guards Army in full control of Kupyansk – MoD
Troops confirm they are holding positions and continuing to clear the city of remaining enemy forces. https://t.co/Ik1J6RwFLz pic.twitter.com/BNjNeV5VBz
— Sputnik (@SputnikInt) December 27, 2025
कुप्यांस्क शहर हे रस्ते आणि रेल्वे मार्गांचे प्रमुख केंद्र असल्याने लष्करी रसद पुरवठ्याच्या दृष्टीने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शहराचा ताबा मिळवल्यामुळे रशियाला खार्किव भागात आपली पकड अधिक मजबूत करता येणार आहे. रशियाने यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही या शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला होता, परंतु डिसेंबरमध्ये युक्रेनने जोरदार प्रतिहल्ला चढवून शहराच्या जवळपास ९० टक्के भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले होते. आता पुन्हा एकदा रशियाने अचानकपणे या शहरावर पूर्ण ताबा मिळवल्याची घोषणा केल्याने जमिनीवरील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
दुसरीकडे, युक्रेनच्या लष्करी कमांडने कुप्यांस्कमध्ये भीषण संघर्ष सुरू असल्याची पुष्टी केली आहे, मात्र रशियाच्या पूर्ण ताब्याचा दावा अधिकृतपणे मान्य केलेला नाही. काही स्वतंत्र विश्लेषक आणि संरक्षण तज्ज्ञांच्या मते, रशियाचा हा दावा रविवारी होणाऱ्या शांतता चर्चेत दबाव निर्माण करण्याचा एक भाग असू शकतो. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या भेटीत युक्रेनचे पारडे कमकुवत दिसावे, या हेतूने रशियाकडून ही माहिती प्रसारित केली जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र, रशियाने जारी केलेले व्हिडिओ आणि लष्करी हालचाली पाहता, युक्रेनसमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे यात शंका नाही.





