Russia Earthquake : रशिया हादरलं ! किनारपट्टीजवळ लागोपाठ 2 शक्तिशाली भूकंपाचे हादरे

मॉस्को : रशियाच्या कामचातका द्विपसमुहामध्ये आज भूकंपाचे दोन जोरदार धक्के जाणवले. त्यानंतर त्सुनामी लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. आज जाणवलेले भूकंपाचे धक्के ७.४ मॅग्निट्युड इतक्या क्षमतेचे होते. शेवटच्या भूकंपाच्या धक्क्याच्याचा केंद्रबिंदू रशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील पेट्रोपावलोत्सक – कामचाटस्की शहरापासून १४४ किलोमीटर अंतरावर समुद्रात २० किलोमीटर खोलीवर होता.
या शहराची लोकसंख्या १ लाख ८० हजार इतकी आहे. त्सुनामी लाटा उसळल्या असत्या तर या शहराला मोठा धोका निर्माण झाला असता. भूकंपाच्या मुख्य धक्क्यापूर्वी आणि नंतर देखील काही कमी क्षमतेच्या धक्क्यांची नोंद झाली. रशियाच्या आपत्कालिन मंत्रालयाने भूकंपानंतर लगेचच त्सुनामी लाटा येण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे किनारपट्टीजवळच्या रहिवाशांना किनाऱ्यापासून दूर जाण्याची सूचना दिली गेली होती. मात्र कालांतराने हा इशारा मागे घेण्यात आला.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोठेही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच मालमत्तेचेही नुकसान झाले नाही. त्यामुळे किनाऱ्याजवळील लोकांना दुसरीकडे हलवण्याची कोणतीही योजना नसल्याचे आपत्कालिन मंत्रालयाने स्पष्ट केले. दिनांक ४ नोव्हेंबर १९५२ रोजी कामचटका येथे ९.० तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले होते. परंतु हवाईमध्ये ९.१ मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्यानंतरही कोणत्याही मृत्यूची नोंद नव्हती.





