Pune | कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी धावाधाव

पुणे : केंद्र शासनाच्या लेखा परीक्षण विभागाने महापालिकेच्या मालमत्तांचे लेखा परीक्षण केले आहे, त्यामध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांच्या अनियमितता आढळली आहे. ज्या प्रकरणांत आक्षेप घेण्यात आला आहे, त्याची कागदपत्रे सादर केली जात असून, हे परीक्षण अंतिम नसल्याचे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी व्यक्त केले आहे.
अंतिम लेखा परीक्षणानंतर महापालिकेचे नुकसान झालेले आढळल्यास त्याबाबत पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेचे वाहनतळ, ॲमेनिटी स्पेसच्या जागा यांसह अन्य प्रकारच्या जागा भाड्याने देताना प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडली आहे का?, भाडे किती निश्चित केले, त्याची थकबाकी किती, वसुली किती, यांसह अन्य प्रकारची माहिती या लेखापरीक्षणामध्ये तपासली जात असल्याचेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या लेखापरीक्षण विभागाकडून प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांच्या वापराचे लेखापरीक्षण होत आहे. महापालिकेच्या मालमत्तेची माहिती घेतल्यानंतर या विभागाने जानेवारी महिन्यात आयुक्तांना त्याचा अहवाल पाठवला. त्यात सुमारे ४०० कोटींची अनियमितता असल्याचे पत्र पाठविले आहे. मात्र, त्यावर गेल्या दहा महिन्यांत काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला होता. त्यावर महापालिकेकडून हा खुलासा करण्यात आला आहे.
महापालिकेच्या भाडेकराराने देण्यात आलेल्या मिळकतींची माहिती लेखा परीक्षणात तपासली जात आहे. ज्या त्रुटी आढळतील, त्यांची लगेच पूर्तता करून कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांचे आक्षेप रद्द होतील.
– पृथ्वीराज बी.पी (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)





