Rushikesh Vaidya : दैवी शक्तीचा बनाव आणि महिलांवर अत्याचार; पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक
Rushikesh Vaidya : फेसबुकवरून ओळख वाढवून 'दैवी शक्ती' असल्याचा बनाव; गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणाऱ्या ऋषीकेश वैद्यला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी.

Rushikesh Vaidya – दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करीत महिलेवर अत्याचार करून पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी वैद्य याला वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आरोपीची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडीची मागणी केली.
न्यायालयाने त्याला ६ एप्रियपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने (वय ३५ ) पाेलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने पोलिसांनी दिली. वसई येथील भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये समाज माध्यमातून तिची ओळख झाली.
पीडित महिला व्रतवैकल्ये करायची. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो, अशी बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले.
वसईतही तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला पिडीतीने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथकांकडून वैद्य याचा शोध घेण्यात येत होता. पिंपरी परिसरात वैद्य असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केेले, अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
“आरोपी पुरोहित म्हणून काम करतो तर पिडीत महिला त्यांची भक्त आहे. फेसबुकवर ओळख झाल्यावर त्यांचे मेसेंजरवर बोलणे होत होते. यांतर मांजरी येथील लॉजवर आरोपी आल्यावर त्यांचे संबंध आल्याचे तपासात समोर आले आहे.”
– राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त , परिमंडळ सहा






