Rural AC Market : ग्रामीण भागाचा ‘स्वॅग’ बदलला! उन्हाच्या तडाख्यामुळे गावागावात आता ‘कुलिंग’चा थाट
Rural AC Market : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे ग्रामीण भागात एसीची मागणी वाढली; एसी विक्रीच्या आकड्यांनी ओलांडली ५० टक्क्यांची मर्यादा.

Rural AC Market – दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याचा तडाखा अधिक तीव्रतेने जाणवत असून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आता शहरांप्रमाणे ग्रामीण भागात एसी बसविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या तापमानापुढे पंखे आणि कुलर अपयशी ठरत असल्याने नागरिकांना एसीचा आधार घ्यावा लागत असून, यंदा विक्रीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात पाणी, शेती आणि मोकळे वातावरण असूनही यंदा उष्णतेने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सरासरी तापमान ३९ ते ४१ अंशांच्या दरम्यान राहिल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाच्या वेळाही बदलल्या आहेत. सकाळी १० नंतर आणि दुपारी ५ वाजेपर्यंत उन्हामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी उष्णता असह्य होत असल्याने अनेक नागरिक घराबाहेर अंगणात झोपण्यास पसंती देतात. मात्र, ग्रामीण भागात जुन्या वाड्यांमुळे सापांचा वावर असल्याने घराबाहेर झोपणे धोक्याचे ठरत आहे. या सुरक्षिततेच्या कारणामुळे नागरिक घरात एसी बसवून घेणे पसंत करत आहेत.
केवळ घरगुती वापरासाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायातही एसीची मागणी वाढली आहे. दुपारी जेवणाच्या वेळी ग्राहकांना उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी एसी यंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. एसीसोबतच कुलर आणि फ्रिजच्या विक्रीतही यंदा मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
“यावर्षी ग्रामीण भागातही उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा एसी खरेदीचे प्रमाण ५० टक्क्याने वाढले आहे. घरगुती तसेच हॉटेल व्यावसायिक यावर्षी मोठ्या प्रमाणात एसी खरेदी करत आहेत. तसेच कुलर व फ्रीझरची खरेदी करण्याचे प्रमाणही ५० टक्क्याने वाढले आहे.”
– अक्षय चांगेडीया, व्यावसायिक.




