रूपगंध : अनुभूती

गॅलरीमध्ये झोपाळ्यावर बसून समोरच्या डोंगराकडे पाहत होतो. हिरब्यागार झाडांची शाल पांघरून तो शांत निजला होता. आभाळात हळूहळू काळ्या ढगांची गर्दी जमू लागली होती. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात झाडांच्या फांद्या जणू त्या झोपलेल्या डोंगराला गदगदून हलवत जाग्या करत होत्या. माझ्या कानी पडणारी मोराची केकराव त्याच्या पण कानी पडत असेल का, या कल्पित विचारात हरवलो असतानाच मोबाईलची रिंग ऐकू आली. “…..सर, झाली का झोप?” “कधीच. सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत अंथरुणात पडून राहायचं ठरवलं कि सगळं उलटंच होतं. हमखास पहाटेच जाग येते. ठरवून काही करायचं म्हंटल कि मध्येच माशी शिंकते !” “सर, आपले ठरवून केलेले बेत आजवर कधी फत्ते झालेत का? म्हणूनच तुम्हाला अचानक फोन करून विचारतोय, फिरायला जायचं का?” मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला.
तासाभराने गोपाळ घरी हजर झाला. चहा घेऊन आम्ही नारायणपुरच्या वाटेने निघालो. सकाळी ज्या डोंगराला दुरून न्याहाळत बसलो होतो, आता त्याच्याच पायथ्यापासून जाताना मन उल्हासित झाले होते. घाटातून वेडीवाकडी वळणे घेत गाडी पुढे जात होती. “गोपाळ, निसर्गाच्या कुशीत गेल्यास जे समाधान मिळतं त्याला कशाचीच तोड नाही !” “अगदी बरोबर.” भातशेतीत दगडांच्या बंधाऱ्यावरून वाहणारे पाण्याचे लहानशे झरे मनमोहक वाटत होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला काहीठिकाणी ताडपत्री ठोकून कणीस भाजून देणारी दुकाने थाटली होती.
वर नजर गेली तर डोंगराच्या कडेवर घट्ट बिलगून बसलेल्या दरडी भयावह वाटत होत्या. “गोपाळ, दरड कोसळण्याची भीती कशी वाटत नसेल या लोकांना?” “पोटाची खळगी भरताना कसली आली मरणाची भीती?” दुसऱ्या बाजूला तोच डोंगर पोखरून सिमेंटच्या अलिशान बंगल्यांनी बस्तान मांडलं होतं. “कुशीत शिरणं आणि निसर्गाचं पोट फाडून वास्तव करणं यात खूप फरक आहे !” गोपाळने माझ्या बोलण्यातला रोख ओळखला होता. “सर, जीवाची उत्पत्ती होण्याआधी निसर्ग अस्तित्वात होता हे आपण विसरलो ! तो त्याच्याच जागी आहे. कितीही ओरबाडून खाल्ल तरी पोट न भरणारी आपली माणसाची जात!”
बोलताबोलता नारायणपुर आले. त्यादिवशी सगळी दुकाने बंद दिसत होती. पहिल्यांदाच एवढा शुकशुकाट दिसून येत होता. दोन दिवस आधीच भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नारायण महाराजांचे (अण्णांचे) निधन झाले होते. आम्ही मंदिरात प्रवेश करून श्री. दत्ताचे दर्शन घेतले. पेटीवर सूर लावून गोड गळ्याने भजन गाणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या भगव्या कपड्यातील टाळकरी मंडळींना पाहून आमचा पाय पुढे निघत नव्हता. मृदुंग आणि पकवाजावर पडणारी थाप एक वेगळीच उर्जा देत होती. आम्ही देखील त्यांच्या बाजूला बसून टाळ्यांच्या गजरात भजन ऐकण्यात तल्लीन झालो.
‘गुरुविण कोण दाखवील वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट….’ ऐकताना अंगावर शहारे येत होते. समोर गर्दीत बसलेला एक पुरुष ढसाढसा रडत होता. त्याच्या डोळ्यात ईश्वर आणि अण्णांच्याप्रती असलेली निस्सीम भक्ती दिसून येत होती. ‘माणसातला माणूस जागा करणे’ हा नारायण महाराजांचा उद्धेश, त्या पुरुषाकडे पाहून सार्थ झाला असावा असच वाटत होतं ! शेवटी माणूस संवेदनशील असतो. कदाचित संवेदनशीलच; माणूस असतो ! हे म्हणणं त्याहून अधिक रास्त ठरेल.
बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पुढे मार्गक्रमण करत आम्ही सासवडकडे निघालो. “गोपाळ, तुला पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना दाखवतो. गाडी डाव्या बाजूने वळव.” मी यापूर्वी कुटुंबासोबत चांगावटेश्वर मंदिर पाहिले होते. मंदिराच्या परिसरातील उंचच उंच झाडे, मंदिरात प्रवेश करताना नितळ वाहणारा ओढा आणि समोर पायऱ्या चढून गेल्यानंतर दिसणारे दोन विशाल दीपमाळ पाहताच गोपाळ भारावून गेला. सभामंडपातील भव्य नंदीला हात जोडून आत गाभाऱ्यात जावून आम्ही शिवलिंगाचे दर्शन घेतले. मंदिरावरील नक्षीकाम, आजूबाजूला असणारी चिंचेची झाडं, रंगीबेरंगी फुलांच्या वेलींनी भिंतीवर घातलेली आरास पाहून मन प्रफुल्लीत झाले होते.
काळसर दगडांच्या भिंतीवर डोकावणारा पिवळाजर्द चाफा पाहून मी पार हरखून गेलो होतो. हे चित्र डोळ्यात सामावून घेताना आठवण म्हणून कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरता येत नव्हता ! कधी पायऱ्यांवर तर कधी चाफ्याच्या झाडाजवळ उभं राहून मनसोक्त फोटो काढले. खाली जमिनीवर सुस्तावून पडलेली मांजर कॅमेऱ्यात टिपताना, ती भलताच भाव खात ‘कॅटवॉक’ करत निघून गेली !
आभाळ कोरडे झाले होते. कऱ्हा आणि चांबळी नदीच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर नजरेस पडत होते. सुमारे सात शतकांपासून उन, वारा, पाऊस झेलत भगवान शंकराचं मंदिर अगदी दिमाखात उभं होतं. चांबळी नदीच्या बाजूने असलेला लोखंडी पूल ओलांडून जाताच मंदिराच्या दगडी पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्या चढून वर जाताच स्थापत्य आणि शिल्प कलेचा अद्भुत नजारा दृष्टीस पडला. पुरातन भव्य नंदी, जवळपास तीस दगडी खांबावर उभारलेला मंडप, मध्यभागी तुळशीवृंदावन आणि तेवढ्याच भव्य दगडी दीपमाळा ! दोन्ही नद्यांचे पाणी संथगतीने वाहत होते.
तीरावरच्या झाडांचे प्रतिबिंब त्या पाण्यात ठळक दिसून येत होते. काहीवेळ निवांत बसून राहिलो. निसर्गाने केलेली सौंदर्याची उधळण पाहून मन भरून आले होते ! कऱ्हेच्या तीरावर बसून आचार्य अत्रे यांचे ‘कऱ्हेचे पाणी’ आत्मचरित्र आठवणार कसं नाही ! शिक्षण, राजकारण, साहित्य, नाटक, सिनेमा, पत्रकार अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या अष्टपैलू व्यक्तीबद्दल आम्ही दोघे बोलत बसलो. दोन्ही नद्यांना हात जोडून घेताना कृतज्ञतेचा भाव मनी उमटला होता !
कऱ्हा नदीतीरी असलेल्या संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू ‘संत सोपानदेव’ समाधी मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच अनुभूती आली. थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जमिनीवर पाय ठेवताच मनाला निस्सीम शांती मिळाली. आम्ही समोरच्या सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात उभं राहून कितीही हळू आवाजात बोललं; कि तो आवाज दुसऱ्या कोपऱ्यात अगदी ठळक ऐकू येत होता ! गाभाऱ्यात बारा ज्योतिर्लिंगाची चित्रे होती आणि मंदिराच्या बरोबर मागे सोपानदेव महाराजांचे समाधी स्थळ होते. मंदिराच्या सभागृहात मारुतीरायाच्या मूर्तीसमोर वीणावादन सुरु होते.
एक वयस्कर प्रवचनकार प्रवचन सांगत होते. कुणी डोळे मिटून घेतले होते; तर कुणी हात जोडून ईश्वराचे स्मरण करीत होते. समाधीस्थळी चौथरा आणि त्यावर पितळेचा सुंदर मुखवटा होता. आम्ही समाधीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. छोटेखानी दत्त मंदिर आणि मुक्ताबाई मंदिर तेवढेच सुंदर वाटत होते. मुक्ताबाईची ठेंगणी आणि सुबक मूर्ती विलोभनीय वाटत होती. देहभान विसरून आम्ही त्या मूर्तीकडे पाहत राहिलो. मातापित्याच्या देहत्यागानंतर आपल्या भावंडांची जणू ती माउलीच झाली होती ! समोर एक विशाल चिंचेचे झाड होते. “सर, या झाडामध्ये कशाची प्रतिमा दिसते?” मी थोडावेळ खालून वरपर्यंत त्या वृक्षाला न्याहाळत बसलो. मला वर एका फांदीला गणपतीच्या मूर्तीसारखा आभास झाला. बाप्पाची सोंड आणि कान. मी म्हंटल,“मला तर गणपतीची प्रतिमा वाटते.” गोपाळने हसून होकारार्थी मान हलवली.
“बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत निरखून बघितलं की ठिकठिकाणी बाप्पाचा चेहरा दिसतोय.” “अरे हो कि. आश्चर्यच म्हणायचं !” मंदिराबाहेर पडताना प्रवचनात दंग असलेली वयस्क मंडळी पुन्हा एकदा नजरेस पडली. “सर, अजून काही वर्षांनी धोतर-पायजमा आणि नऊवारी साडीत अशी लोकं दिसतील?” “आपण स्वतःला नशीबवान समजायचं; कि आपल्याला या पिढीचा सहवास लाभला. त्या काळातील कुटुंबव्यवस्था आणि त्याचा मुख्य आधारवड म्हणजे घरातील वयस्क मंडळी. त्यांच्याकडून आपल्याला जी संस्काराची शिदोरी मिळाली तीच आपल्या पुढच्या पिढीला देता आली म्हणजे झालं !” त्यातल्या एका वृद्ध आजीकडे पाहून मला माझ्या माईची आठवण आली.
दिवस मावळतीकडे झुकला होता. सूर्याच्या लालकेशरी रंगछटांनी आकाश भरून गेलं होतं. सकाळी काळवंडलेलं आभाळ निरभ्र झालं होतं. परतीचा प्रवास चालू झाला. पुरंदर किल्ला स्पष्ट नजरेस पडत होता. “याच वाटेवरून कधी आपले छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन गेले असतील. नाही का ?” “आणि संभाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी हाच पुरंदर आणि सारा आसमंत जयघोषांनी दणाणून निघाला असेल !”
सुख मृगजळासारखे ! आनंद सागरासमान ! लहानसहान अनुभवातून मिळालेले सुख आपल्याला आनंदाचीच तर अनुभूती देते ! किती वेगवेगळ्या अनुभूती आल्या होत्या ! दत्ताच्या मंदिरातील ईश्वराचा वास; भाविकाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुमध्ये गुरूविषयी असलेली निष्ठा; समाधी मंदिरातील चिंचेच्या त्या वृक्षाखालून समाधीस्थळी प्रस्थान करणारे संत सोपानदेव….! भूतकाळ मागे पडतो; पण तो जाणण्यात, उलगडण्यात मन गुंतत जाते. विस्मृतीत पडलेल्या आठवणींना उजाळा देताना, जणू तो भूतकाळ पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो. माणसाच्या जगण्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो !
अमोल भालेराव





