रुपगंध : मानसिक संतुलन

मानसिक संतुलनास खूपच महत्त्व आहे, म्हणूनच आपल्या आयुष्यात मानसिक संतुलन राखणे का आवश्यक आहे नेमके याच विषयी थोडेसे…
आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच चढ-उतारांना सामोरे जात असतो. सध्याच्या काळात आपल्याला बऱ्याच मानसिक ताणतणावातून जावे लागत असते. आपल्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. त्या पार पाडताना खूपच शारीरिक, मानसिक ओढाताण होते. आपल्या आयुष्याची ही जरी एक बाजू व वस्तुस्थिती असली तरी आपण आपला मानसिक व शारीरिक ताण हलका करायला हवा. मानसिक तणाव निर्माण होऊ न देणे हे आपल्याच हाती असते. बरेच जण कर्ज काढतात पण ते फेडता आले नाही की मानसिक ताण येतो. तसेच काही व्यसने लावून घेतली की शारीरिक व्याधी कालांतराने निर्माण होतात. एकदा शारीरिक स्वास्थ्य गेले की मानसिक स्वास्थ्यही हळूहळू जाते. अशा प्रकारे आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात काही प्रश्न निर्माण करत असतो. त्या प्रश्नांमुळे आपले मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो.
वैद्यकशास्त्रामध्ये काही व्याधी-विकार झाल्यावर इलाज असतात, त्याचप्रमाणे काही व्याधी-विकार होऊच नये यासाठीही प्रयत्न केले जातात. त्याच प्रमाणे आपण आपल्या आयुष्यात संभाव्य प्रश्नच निर्माण होऊ द्यायचे नाहीत याची काळजी घ्यायची. जसे व्यवसायासाठी कर्ज काढण्यापूर्वी आपण आधी नियोजन करावयाला हवे. आपले एक नियोजन फसले तर दुसरे तयार असायला हवे. यामुळे आपण मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहू, आनंदात राहू. थोडक्यात सांगायचे तर आपण आपल्या तन व धन यांची काळजी घेतली की मनही आनंदात राहते.
आपल्याला “युधिष्ठीर’ बनायचे आहे. युधिष्ठीर या शब्दाचा अर्थ “युद्धात स्थिर राहणारा’. युद्धात कायम परिस्थिती बदलत असते. अशा अनिश्चित परिस्थितही जो विचलित होत नाही, तो युधिष्ठीर. म्हणजेच युद्धजन्य परिस्थितीतही तो मानसिक संतुलन ढळू न देता मन शांत ठेवून, आपले लक्ष केंद्रित ठेवू शकतो. आपल्यालाही रोजच कितीतरी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते. रोजच कितीतरी तणावाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीतही आपले मन शांत व स्थिर ठेवायचे असते. आपले मन जेव्हा शांत व स्थिर असेल तेव्हाच आपण चांगला निर्णय घेऊ शकतो. चांगले काम करू शकतो. चांगले नियोजन करू शकतो. आपले संतुलन बिघडू द्यायचे नाही याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे.
आपल्या भोवती असेसुद्धा काही लोक असतात की ज्यांना आपण काही चुकीचा निर्णय घ्यावा असे वाटत असते, त्यामुळे ते आपले मानसिक संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न करत असतात. क्रिकेट खेळामध्ये तर असे नेहमीच घडत असते. फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ खूप काही शेरेबाजी करत असतो. राहुल द्रविड त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये वेगळे विक्रम आहेत ते असे- “राहुल द्रविड यांनी कसोटी सामन्यांत सगळ्यात जास्त म्हणजेच 31258 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळपट्टीवर सर्वात जास्त वेळ म्हणजेच 44152 मिनिटे उभे राहिलेले आहेत. तर आपल्या कसोटी कारकिर्दीत एकदाही शून्य धावांवर बाद झाले नाहीत.
एकदिवसीय सामन्यांत 13 वेळा शून्यावर बाद झाले, पण सलग 120 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकदाही शून्यावर बाद झाले नाहीत हाही एक अनोखा विक्रम आहे.’ तर पाकिस्तानचे खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्या नावावर एक विक्रम आहे तो असा- “शाहिद आफ्रिदी यांनी 398 एकदिवसीय सामने खेळले पण फलंदाजी करताना एकदाही शंभरपेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला नाही, तर 30 वेळा शून्यावर बाद झाले.’ तर 27 कसोटी सामन्यांत फारच कमी वेळा शंभरपेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला. शाहिद आफ्रिदी हे काही शांत स्वभावाचे नाहीत हे काही वेगळे सांगायला नको. येथे दोन भिन्न मनोवृत्तीतील फरक हा कामगिरीवर कसा परिणाम घडवून आणतो हे लक्षात येते.
आपण एकाग्रता अबाधित राखून, मानसिक संतुलन सांभाळायचे आहे. आपल्यालाही काम करताना इतर बरेच जण आपले मानसिक संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आपण “हितशत्रू’ असेही संबोधत असतो. हे हितशत्रू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्यावर हल्ला करत असतात. जेव्हा आपले काही प्रयत्न अपयशी ठरतील त्यावेळेस आपल्याला आवर्जून संपर्क साधून “सगळ्या जगात आपणच सर्वात जास्त मूर्ख आहोत’ हे आपल्याला पटवून देतात.
आपण “ऐकावे जनाचे करावे मनाचे’ या सूत्राप्रमाणे सर्व बाजूंनी सारासार विचार करूनच आपल्याला जे योग्य वाटते तेच करावे. इतरांच्या शेरेबाजीवर विचार न करता, त्यांच्या शेरेबाजीतून आपण आपला निश्चय व संयम अधिक दृढ करावा. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवावा. आपल्या हितशत्रूला आपण जे काम करू नये असे वाटत असते, त्यादृष्टीने तो आपल्याला त्या कामापासून लांब घेऊन जाऊ पाहात असतो. त्याची ही चाल आपण वेळीच ओळखली पाहिजे. त्याला जे अपेक्षित आहे ते आपण अजिबात करता कामा नये. ही होणारी आपली दिशाभूल वेळीच ओळखली पाहिजे. यासाठी आपले मन आपल्या कामावर केंद्रित असणे आवश्यक असते.
आपण आपले मानसिक संतुलन राखण्यासाठी आपले ज्ञान, अनुभव, कौशल्य, चौकसपणा आणि इतरही बऱ्याच काही गुणांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावयाचा आहे. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि आपण कमजोर पडत जातो अशा वेळी आपले मानसिक संतुलनही ढळू लागते. अशी प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्याला आपले सर्वस्व पणाला लावावे लागते. प्रतिकूल परिस्थिती केव्हा निर्माण होईल हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपल्या हातात काही नसते.
जसे एकादे काम मिळविण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो, पण शेवटी आपल्याला काम द्यावयाचे की नाही याबाबतचा निर्णय घेणारी व्यक्ती कोणता निर्णय घेईल हे सांगता येत नाही. अशा प्रसंगी जरी आपल्याला काम मिळाले नाही तरी आपले मन शांत ठेवायचे. आत्मपरीक्षण करावयाचे. आपल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहोत, तर मग इतर काही कारणास्तव काम मिळाले नसल्याने मनाला जास्त त्रास करून घ्यावयाचा नाही.
आपले मनःस्वास्थ्य इतके अनमोल आहे की आपण सदृढ मनःस्वास्थ्याद्वारे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला आपल्या मानसिक संतुलनाचे पुष्प अर्पण करावयाचे आहे. आपली मनोदेवता प्रसन्न होऊन आपला कसा उद्धार करते याचा अनुभव घ्याच.
– अनिकेत भालेराव





