रूपगंध : साहस

साहसे श्री: प्रतिवसति असं शूद्रकानं लिहिलेल्या मृच्छकटिक नाटकातील शर्विलक नावाचं पात्र मदनिकेला सांगतं. साहसामध्येच लक्ष्मीचा अधिवास असतो असा याचा अर्थ आहे. सहसा या क्रिया विशेषणावरून साहस हा शब्द तयार झाला आहे. सहसा या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ अचानक, अविचारानं (केलेलं कृत्य) असा होतो. मात्र, साहस या शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. ज्याला आपण इंग्रजीत ऍडव्हेंचर असं म्हणतो ते म्हणजे साहस. कधी कधी साहस विचारपूर्वक केलं जातं तर कधी ते पुढचा-मागचा विचार न करता केलं जातं. विचारपूर्वक केलेल्या साहसाला व्यावसायिक परिभाषेत कॅलक्युलेटेड रिस्क असं संबोधलं जातं. अविचारानंही केलेलं साहस म्हणजे दु:साहस.
नवीन उद्योगाची उभारणी करताना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागते. जमा केलेल्या पैशाचा (विशेषत: लोकांच्या) योग्य विनियोग करून नफा मिळवायचा यासाठी साहसाची आवश्यकता असते. आपण गुंतवलेला पैसा हा कुणाच्या तरी घामाचा, कष्टाचा आहे हे सदोदित समोर ठेवल्यास अचूक निर्णय घ्यायला मदत होईल. रिस्क टेकिंग हे व्यवसायातील आवश्यक तत्त्व प्रत्येक मॅनेजमेंट गुरूनं सांगितलेलं आहे. पण ही रिस्क आततायी नसावी.
खेळामध्ये साहसाचा भाग मोठ्या प्रमाणावर असतो. ऍथलेटिक्समध्ये आपली क्षमता सर्वोच्च बिंदूवर नेणं (शरीरावर आणि मनावर दुष्परिणाम न होऊ देता) हे तत्त्व ध्येयाकडे नेत असतं. उसेन बोल्ट हा जागतिक विक्रमी धावपटू आपण सर्व प्रतिस्पर्ध्यांना हरवू शकतो असं स्वत:ला मनातल्या मनात कायम बजावीत असे. त्यातून साहस निर्माण झाल्यानं त्याच्याकडून विश्वविक्रम स्थापित झाले. इतर खेळांनाही-विशेषत: सांघिक-हेच लागू होतं. तिथे कप्तानाला आपल्या सहकाऱ्यांच्या विजयश्री खेचून आणण्याच्या क्षमतेची जाणीव करून द्यावी लागते, त्यांच्यात जोश निर्माण करावा लागतो.
मग खेळाडूंमध्ये साहस निर्माण होऊन ते अटीतटीचा खेळ करतात आणि विजय खेचून आणतात. कपिल देवनं 1983च्या विश्वकरंडक स्पर्धेत नेमकं हेच केलं आणि कुणीही कल्पना केलेली नसताना भारताला विश्वचषक मिळवून दिला. बिलिव्हिंग इज हाफ द बॅटल वन असं अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती थिओडोर रूझवेल्ट यांनी म्हटलं आहे. म्हणजे तुमच्या क्षमतेबद्दल जर तुम्हाला विश्वास असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. आपल्या प्राणांची बाजी लावणारे क्रांतिकारक साहसीच होते. त्यांच्यासमोर स्वातंत्र्य हे एकच ध्येय होतं आणि त्यासाठी परम त्यागाची त्यांची तयारी होती.
पूर्वी शिकार हा साहसी खेळ मानला जात असे. आता ते निसर्गचक्राच्या विरुद्ध असल्यानं बेकायदेशीर आहे. त्याची जागा आता वन्य प्राण्यांशी मैत्री करणे किंवा अरण्यात कुठल्याही आधुनिक उपकरणांशिवाय राहणे या साहसी प्रकारांनी घेतली आहे. विख्यात निसर्गप्रेमी बेअर ग्रिल्स हा साहसी जीवन अरण्यांमध्ये व्यतीत करीत असतो. त्याच्या नैसर्गिक सहवासातला प्रत्येक क्षण साहसीच असतो. वन्य-विशेषत: हिंस्र प्राण्यांशी-मैत्री हा प्रकार अतिसाहसी प्रकारात मोडावा. नामांकित ऑस्ट्रेलियन प्राणीप्रेमी स्टीव्ह आयर्विन हा स्टिंग-रे या हिंस्र जलचरावरील प्रेमाचं चित्रीकरण करीत असताना अचानक त्या जलचरानं आपली तीक्ष्ण नांगी आयर्विनच्या छातीत घुसवली. या दंशामुळे आयर्विन मृत्युमुखी पडला. याच आयर्विननं आपल्या लहान मुलांना हिंस्र सुसरीच्या जबड्याजवळ धरलं होतं आणि या कृत्याबद्दल तो तीव्र टीकेचा धनी बनला होता. हे अतिरेकी साहसच म्हणावं लागेल.
आपल्याला रोजच्या जीवनातही अनेकदा साहसी लोक पाहावयास मिळतात. रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ दाखवणारी लहान मुलगी साहसीच नव्हे काय? जत्रेत किंवा सर्कशीत मृत्युगोलासारखे प्रकार दाखवणारे साहसीच होत. गिर्यारोहक आणि कडेकपारींवर चढाई करणारे हे नेहमीच साहस करीत असतात. वैमानिकाला प्रत्येक उड्डाण तर अंतराळयात्रीला प्रवासातील प्रत्येक क्षण हे साहसीच असतात.
आजकालच्या गर्दीच्या जमान्यात रस्ता ओलांडून पलीकडे जाणं हे साहसच आहे की काय असा संभ्रम मनात निर्माण होतो! तसंच अतिवंचित, बेघर लोकांकडे त्यांचं रस्त्यांवरचं जगणं पाहिलं की त्यांच्या जीवनातला प्रत्येक दिवस साहसातच व्यतीत होतो की काय, असा विचारही मनात आल्याशिवाय राहत नाही!
– श्रीनिवास शारंगपाणी





