Satara | रुपेश जाधव यांच्या कर्तृत्वाचा राज्य पुरस्काराने सन्मान

सातारा, (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी विविध उपक्रम राबविणारे काेरेगाव तालुक्यातील निगडी जि. प. शाळेचे शिक्षक रुपेश लक्ष्मण जाधव यांच्या आदर्श शैक्षणिक कार्य, कर्तृत्वाचा शिक्षक दिनी मुंबईतील टाटा थिएटरमध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या विशेष पुरस्कार वितरण साेहळ्यात सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,
शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षण उपसंचालक संपत सुर्यवंशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगाैरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व १ लाख १० रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कार वितरण साेहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे काैतुक करुन यापुढे आपला महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत देशात अव्वल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ना. दीपक केसरकर, अॅड. राहुल नार्वेकर यांनीही मनाेगत व्यक्त केले. आयुक्त सुरज मांढरे यांनी प्रास्ताविक केले.
रुपेश जाधव यांनी माण तालुक्यातील शेनवडी, कोरेगाव तालुक्यातील आर्वी व निगडी शाळेला उर्जितावस्था प्राप्त करुन देत जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गुणवंत विद्यार्थी घडविण्याबराेबरच राष्ट्रीय स्पर्धेत चमकलेले खेळाडू त्यांनी घडविले आहेत.
20 लक्ष रुपयांपेक्षा जास्त शैक्षणिक उठावातून त्यांनी निगडी शाळेत भाैतिक सुविधा निर्माण करण्याबराेबरच एक माॅडेल स्कूल निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांनी लिहिलेले अनेक शैक्षणिक साहित्य व ग्रंथ राज्यस्तरावर प्रकाशित आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील अनेक नियतकालिकांत संशाेधनपर शैक्षणिक निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत सदर संशोधनपर निबंधाचे सादरीकरण देखील केले आहे.
पुणे येथील SCERT मध्ये त्यांनी राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेत काम केले असून शासनाच्या दीक्षा ॲप वरती त्यांनी तयार केलेले अनेक शैक्षणिक व्हिडिओ अपलोड आहेत.
दरवर्षी त्यांच्या वर्गातील पटसंख्येमध्ये वाढ झाली असून त्यांनी विद्यार्थ्यांची १०० टक्के गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीवर तज्ञ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा अनेकवेळा गाैरव झालेले आहे. त्यांना जिल्हा परिषदेचाही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
त्यांच्या शैक्षणिक याेगदानाबद्दल शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय कमिटीने त्यांची यावर्षीच्या ‘क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगाैरव पुरस्कारा’ साठी निवड केली हाेती.





