Rupee Vs Dollar: रुपया घसरून नव्या निचांकावर

मुंबई – रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्राचा मारा सुरू केल्यामुळे जागतिक तणावात भर पडली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणार्या डॉलरमध्ये गुंतवणूक वाढत असल्यामुळे डॉलर बळकट होत आहे. याचा दबाव इतर चलनांबरोबरच भारतीय रुपयावर पडत आहे. यामुळे गुरुवारी रुपयाचा भाव पुन्हा आठ पैशांनी कोसळून 84 रुपये 50 पैसे प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला.
जागतिक परिस्थिती बिघडल्यामुळे आता खनिज तेलाचे दर वाढू लागले आहेत. भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूक परत जात असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले आहेत. नोव्हेबर महिन्यात आतापर्यंत परकीय संस्थागत गुतवणूकदारांनी तब्बल 35,000 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 3,411 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
या घडामोडीचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. डॉलर वधारत असल्यामुळे सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स गुरुवारी 0.04 टक्क्यांनी वाढून 106.66 या पातळीवर गेला आहे. खनिज तेलाच्या किमती गेल्या आठवड्यात स्थिर होत्या. मात्र आज खनिज तेलाचे दर 1.35 टक्क्यांनी वाढून 73.93 रुपये प्रति पिंप या पातळीवर गेले. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के खनिज तेल आयात करतो. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन वापरावे लागणार आहे.
या सर्व घडामोडीचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. लघु ते मध्यम पल्ल्यात रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम राहण्याची शक्यता विश्लेषकानी व्यक्त केली. रुपया घसरत असल्याचा निर्यातदारांना लाभ होणार आहे मात्र आयात प्रचंड महाग होऊन देशात महागाई वाढण्याची शक्यता असते.


