Rupee: रिझर्व बँकेच्या आक्रमक हस्तक्षेपाने रुपयाला दिलासा; एका दिवसात विक्रमी 156 पैशांची उसळी
Rupee : रिझर्व बँकेने व्यावसायिक बँकांना डॉलर मधील व्यवहाराची मर्यादा 100 दशलक्ष डॉलरच्या आत ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत, त्यामुळे ज्या बँकांनी जास्त डॉलर बाळगले आहेत त्यांनी हे डॉलर विकायला सुरुवात केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले.

Rupee: एक महिन्यापासून घसरणार्या रुपयाच्या मूल्याला रोखण्यासाठी रिझर्व बँकेने गुरुवारी आक्रमक हस्तक्षेप केला परिणामी एकाच दिवसात रुपयाचे मूल्य विक्रमी 156 पैशांनी म्हणजे एक पॉईंट सहा टक्क्यांनी उसळून रुपयाचा भाव 93.14 प्रति डॉलर या पातळीपर्यंत वधारू शकला.
रिझर्व बँक आतापर्यंत खुल्या बाजारात डॉलरची विक्री करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत होती मात्र खनिज तेलाचे दर वेगाने वाढल्यामुळे 28 फेब्रुवारी पासून रुपयांच्या मूल्यात जवळजवळ 5% ची घट झाली होती त्याचबरोबर सरलेल्या आर्थिक वर्षात रुपयाचे मूल्य तब्बल दहा टक्क्यांनी कोसळले आहे.
त्यामुळे महागाई भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने व्यवसायिक बँकांना डॉलर मधील व्यवहार करण्यास मर्यादा आणल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी रिझर्व बँकेने 10 एप्रिलच्या आत सुरू करण्यास सांगितल्याने भारतातील व्यावसायिक बँकांनी आपल्याकडील डॉलर विकले.
त्यामुळे रुपयाच्या मूल्याला दुपारनंतर जास्त आधार मिळाला विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जोपर्यंत इराण नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत अमेरिका इराणवर हल्ले करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर खनिज तेलाचे दर आज पुन्हा वाढले. मात्र तरीही रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली. रिझर्व बँकेने व्यावसायिक बँकांना डॉलर मधील व्यवहाराची मर्यादा 100 दशलक्ष डॉलरच्या आत ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत, त्यामुळे ज्या बँकांनी जास्त डॉलर बाळगले आहेत त्यांनी हे डॉलर विकायला सुरुवात केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले.
खनिज तेल वधारल्यामुळे आणि युद्ध चालूच राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी अति सुरक्षित समजल्या जाणार्या डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यात गुंतवणूकवाढविल्यामुळे इंडेक्स गुरुवारी 0.60 टक्क्यांनी वाढून 100.05 अंकावर गेला आहे. रुपया वधारल्यामुळे आज जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक उसळून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात वाढण्यास मदत झाली. भारताच्या जीएसटी संकलनात आणि इतर कर संकलनात फारशी घट झालेली नाही याचाही रुपयाला आधार मिळाला.





