Rupee falls: रुपया घसरून नव्या निचांकी पातळीवर

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने कमी होत आहेत. परदेशी गुंतवणूक कमी होत आहे. अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे तर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतासह वेगाने विकसित होणार्या देशांच्या चलनाचे अवमूल्यन होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रुपयाचे मूल्य नऊ पैशांनी घसरून 84 रुपये 89 पैसे प्रति डॉलर या नव्या निचांंची पातळीवर गेले.
डॉलर वधारण्याची शक्यता असल्यानंतर आयात करणारे अगोदरच डॉलरची मागणी जास्त करतात. या कारणामुळे रुपयाच्या मूल्यावर आणखी परिणाम होत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात विश्लेषकांनी सांगितले की, आगामी काळातही रुपयांच्या मूल्यावर दबाव येण्याची शक्यता कायम आहे. मात्र जर अमेरिकेने अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदरात कपात केली तर डॉलर कमकुवत होऊन रुपयाला काही प्रमाणात आधार मिळू शकतो.
खनिज तेलाच्या किमती अजूनही नियंत्रणात आहेत. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर जास्त दबाव आलेला नाही. जर खनिज तेलाच्या किमती वाढल्या तर रुपयाचे मूल्य मात्र बरेच कमी होऊ शकते. दरम्यानच्या काळात परकीय गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2,335 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यांनी ही खरेदी चालू ठेवली आणि महागाई कमी झाली तर रुपयाला आणखी आधार मिळू शकतो.
या आठवड्यात अमेरिकेचे पत धोरण जाहीर होणार आहे. त्याकडे चलन बाजारातील व्यापार्यांचे लक्ष आहे. खनिज तेलाचा दर सध्या 73 डॉलरवर आहे. त्याकडेही गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत.


