रुपयाचे मूल्य कोसळून नव्या निचांकावर

मुंबई- इतर चलनाच्या तुलनेत डॉलर वधाारत असतानाच खनिज तेलाच्या किमती वाढण्याची लक्षणे दिसून येत आहेत. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत आहेत. या कारणामुळे रिझव्हर्र् बँकेने बराच हस्तक्षेप करूनही गुरुवारी रुपयाचा भाव चार पैशांनी कमी होऊन 83 रुपये 87 पैसे प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला.
सध्या मुख्य 6 चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स वाढून 106.22 या उच्चांकी पातळीवर रेंगाळत आहे. दोन महिन्यापूर्वी हा इंडेक्स 100 अंकापर्यंत कमी झाला होता. त्यामुळे जगातील इतर चलनाचा दरही डॉलरच्या तुलनेत कमी होत आहे. फक्त रुपयावर याचा नकारात्मक परिणाम झालेला नाही, असे अर्थ मंत्रालयाने या अगोदर स्पष्ट केले आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळले तर त्याचा जागतिक व्यापाराबरोबरच खनिज तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. तसे झाले तर रुपयाच्या मूल्यावरील दबाव वाढेल. जर रुपयाचा दर कोसळला तर भारताला आयात महागात पडेल आणि महागाई आयात केल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असे समजले जाते.





