रुपयाचा भाव निचांकी पातळीवर घसरला

मुंबई – आयातदाराकडून महिनाअखेर डॉलरची मागणी वाढत असते. त्यामुळे डॉलरचा भाव वधारला. अमेरिका आयात शुल्कात वाढ करणार असल्यामुळे इतर चलनाच्या तुलनेत डॉलर वधारून विक्रमी पातळीवर गेला आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पिछाडीवर आहेत. अशा अवस्थेत मंगळवारी भारतीय रुपयाचा भाव नऊ पैशांनी घसरून 85 रुपये 20 पैसे या नव्या निचांकी पातळीवर गेला.
रुपयाबाबत अनेक नकारात्मक घडामोडी घडत असतानाच जागतिक खनिज तेल बाजारामध्ये खनिज तेलाच्या किमती वधारून 73.13 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेल्या आहेत. त्यामुळे रुपयाला आधार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यापासून भारताकडील परकीय गंगाजळीत घट होत आहे. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे.
शिवाय दोन महिन्यापासून भारताची निर्यात जास्त तर आयात कमी होत आहे. त्यामुळे परकीय व्यापारातील तूट वाढून चालू खात्यावरील तुटही वाढत चालली आहे. या परिस्थितीत नजीकच्या काळात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
भारतीय रिझर्व बँक डॉलरचा वापर करून रुपयाचे मूल्य स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जागतिक पातळीवर अनेक नकारात्मक घडामोडी घडत असल्यामुळे रिझर्व बँकेच्या प्रयत्नांना मर्यादा येत असल्याचे दिसून येते. डॉलर महाग होऊन रुपया घसरत असल्यामुळे भारताला आयात मोठ्या प्रमाणात महागात पडत आहे. त्यामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूच्या किमती रुपयात वाढत आहेत. अशा परिस्थितीत महागाईत आणखी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मात्र केवळ रुपयाच्या मूल्यात घसरण होत नाही तर जगातील इतर सर्वच चलनाच्या मूल्यात गेल्या एक महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत रुपयाची परिस्थिती जरा ठीक आहे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.





