रुपयाच्या मूल्यात 52 पैशांची घसरण; आयातदराकडून डॉलरची मागणी वाढल्याचा परिणाम

मुंबई : भारत – अमेरिकेदरम्यान अंतरीम व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी चालू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतावर अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्क लावणार असल्याचे सांगितले. दरम्यानच्य काळामध्ये महिना अखेर असल्यामुळे आयातदाराकडून डॉलरची मागणी वाढली आहे. यामुळे बुधवारी रुपयाचे मूल्य 52 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 87.43 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला होता.
भारत – अमेरिका व्यापार करार अधांतरी होता. यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आणि रोखे बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत. याचाही नकारात्मक परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदीपेक्षा 4,036 कोटी रुपयांच्या शेअरची जास्त विक्री केली. या घटनाक्रमाचाही भारतीय रुपयावर दबाव आला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. याच कारणामुळे मंगळवारीही रुपयाचा भाव 21 पैशांनी कमी झाला होता.
मिराए अॅसेट शेरखान या कंपनीचे संशोधन प्रमुख अनुज चौधरी यांनी सांगितले की, भारतावर जर अमेरिकेने अतिरिक्त आयात शुल्क लावले तर भारत आणि अमेरिकेदरम्यानची व्यापाराची तूट वाढू शकते. अशा परिस्थितीत भारतीय परकीय गंगाजळीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे भारतीय रुपयाचे मूल्य कमी होत आहे. दरम्यानच्य काळात परकीय गुंतवणूक परत जाण्यांबरोबरच खनिज तेलाच्या किमती 72 डॉलरवर आल्या आहेत. याचाही रुपयावर दबाव येत आहे.
जर करार झाला तर
जर भारत अमेरिकेत दरम्यान करार झाला तर मात्र परिस्थिती सकारात्मक होईल. आता अमेरिकेने भारतावर जास्त आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारासमोर आणखी प्रश्न निर्माण होऊ शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते.





